independenceday-2016

Press Information Bureau

Government of India

Prime Minister's Office

72 व्या स्वातंत्र्यदिनी, लाल किल्ल्याच्या तटावरुन, पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

Posted On :15, August 2018 13:35 IST

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वाच्या तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा!

आज देशात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. स्वप्नांच्या संकल्पासह प्रयत्नांची पराकाष्ठा करत देश नवी उंची गाठत आहे. आजचा सूर्योदय एक नवी चेतना, नवा उत्साह, नव्या अपेक्षा, नवी उर्जा घेऊन उगवला आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपल्या देशात नीलकुरींज नावाचे एक फूल बारा वर्षांनी एकदा फुलत असते. या वर्षी दक्षिणेकडील निलगिरी पर्वतामध्ये हे आपले नीलकुरींज पुष्प जणू काही तिरंगी झेंड्याच्या अशोकचक्राप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर डुलत आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, स्वातंत्र्याचा हा सोहळा आपण त्या वेळी साजरा करत आहोत, ज्या वेळी आपल्या देशाच्या सुकन्या उत्तराखंड, हिमाचल, मणीपूर, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील आपल्या कन्यांनी सात समुद्र पार केले आणि सातही समुद्रांना तिरंग्याच्या रंगांनी रंगवून त्या आपल्यामध्ये परत आल्या आहेत.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, स्वातंत्र्याचा हा सोहळा आपण त्या वेळी साजरा करत आहोत, एव्हरेस्ट सर करण्याच्या अनेक मोहिमा झाल्या. आपल्या अनेक वीरांनी, आपल्या अनेक कन्यांनी, एव्हरेस्ट शिखर सर करून तिथे आपला तिरंगा झेंडा फडकवला. पण स्वातंत्र्याच्या या पर्वाच्या निमित्ताने मी त्यांची देखील आठवण करेन ज्यांनी अतिशय दुर्गम  भागात राहणाऱ्‍या आदिवासी बालकांनी या वेळी एव्हरेस्टवर तिरंगा झेंडा फडकावून या बालकांनी तिरंगा ध्वजाची शान वाढवली आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो संसदेची लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहांचे अधिवेशन नुकतेच संस्थगित झाले आणि तुम्ही पाहिले असेल की या सभागृहांचे कामकाज खूपच चांगल्या प्रकारे चालले आणि एका प्रकारे हे अधिवेशन सामाजिक न्यायाला पूर्णपणे समर्पित होते. दलित असो, पीडित असो, शोषित असो, वंचित असोत, महिला असोत, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी आमच्या संसदेने अतिशय जागरुकतेनं आणि संवेदनशीलतेनं सामाजिक न्याय अधिक बळकट केला.

ओबीसी अर्थात इतर मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यावेळी संसदेने मागासांना अतिमागासांना त्यांच्या आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन, एक घटनात्मक व्यवस्था देऊन त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण आज त्यावेळी स्वातंत्र्याचा हा सोहळा साजरा करत आहोत, ज्यावेळी आपल्या देशात त्या वृत्तांनी नवी चेतना आणली आहे. प्रत्येक भारतीय मग तो देशाच्या कोणत्या ना कोणत्या कानाकोपऱ्‍यात राहणारा असो, त्याला या गोष्टीचा अभिमान वाटत आहे की भारताने जगातील सर्वात आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आपले नाव नोंदवले आहे. अशा एका सकारात्मक वातावरणात, सकारात्मक घटनांच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर आज आपण देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा करत आहोत.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पूज्य बापूजींच्या नेतृत्वाखाली लक्षावधी लोकांनी आपले जीवन खर्ची घातले, तारुण्याचा काळ तुरुंगात घालवला, अनेक क्रांतिकारक महापुरुषांनी फाशीच्या तख्तावर जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशीच्या दोरखंडांचे चुंबन घेतले. मी आज देशवासीयांच्या वतीने स्वातंत्र्यासाठी त्याग करणाऱ्‍या या वीर सेनानींना मनापासून वंदन करतो, अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. ज्या तिरंगा ध्वजाची प्रतिष्ठा, मान-सन्मान आपल्याला जगण्याची, संघर्ष करण्याची आणि बलिदान करण्याची प्रेरणा देते, त्या तिरंग्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या देशाचे जवान आपल्या प्राणांची आहुती देतात, आपली निमलष्करी दले आपले आयुष्य खर्ची घालतात. सर्वसामान्य माणसांच्या रक्षणासाठी आपली पोलिस दले दिवसरात्र देशाच्या सेवेमध्ये कार्यतत्पर असतात.

मी लष्कराच्या सर्व जवानांना, निमलष्करी दलांना, पोलिस जवानांना त्यांच्या महान सेवेबद्दल, त्यांच्या त्याग आणि तपश्चर्येबद्दल, त्यांचा पराक्रम आणि पुरुषार्थाबद्दल आज तिरंगा झेंड्याच्या साक्षीने लाल किल्ल्याच्या चबुतऱ्‍यावरून शतशः नमन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.

 

या वर्षी देशाच्या विविध भागातून चांगल्या पावसाच्या बातम्या येत आहेत, त्याचबरोबर अनेक ठिकाणांहून पुराच्या बातम्याही येत आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या कुटुंबांनी आपल्या आप्तस्वकियांना गमावले आहे, ज्यांना संकटांचा सामना करावा लागला आहे, त्या सर्वांसाठी देश संपूर्ण ताकदीनिशी उभा आहे आणि ज्यांनी आपल्या आप्तस्वकियांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो पुढल्या वेळच्या बैसाखीला जालियनवाला बागेतल्या नरसंहाराच्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. देशातील सामान्य लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी कशा प्रकारे जीवाची बाजी लावली होती आणि जुलुमाच्या परिसीमा किती विस्तारल्या होत्या, त्याची आणि आपल्या देशातील वीरांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण जालियनवाला बाग करून देते आणि आपल्याला प्रेरणेचा संदेश देते. मी त्या सर्व वीरांना हृदयपूर्वक आदरपूर्वक नमन करतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. पूज्य बापूजींच्या नेतृत्वाखाली अनेक महापुरुषांनी, अनेक वीरपुरुषांनी, क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी, सत्याग्रहाच्या विश्वात राहणाऱ्‍यांनी आपले तारुण्य तुरुंगात घालवले आहे. स्वातंत्र्याच्या त्या संग्रामात त्यांनी अनेक स्वप्ने बाळगली. भारताच्या भव्य रुपाला देखील त्यांनी मनामध्ये साकारले आणि स्वातंत्र्याच्या अनेक वर्षे आधी तमिळनाडूचे राष्ट्रकवी सुब्रह्मण्यम भारती यांनी आपल्या स्वप्नांना शब्दात साकारले होते आणि त्यांनी  लिहिले होते

एल्‍लारुम् अमर निलई आईडुमनान

मुरईअई इंदिया उलागिरिक्‍कु अलिक्‍कुम

त्यांनी स्वातंत्र्यानंतर कोणते स्वप्न पाहिले होते. बंधनांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग भारत संपूर्ण जगाला दाखवेल, असे त्यांनी म्हटले होते.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, या सर्व महापुरुषांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी, स्वातंत्र्य सैनिकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, देशाच्या कोटी कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने एका समावेशक राज्यघटनेची निर्मिती केली. आपल्या या समावेशक राज्यघटनेने एका नव्या भारताची निर्मिती केली. आपल्यासाठी ही समावेशक राज्यघटना एका नव्या भारताचा संकल्प घेऊन आली. आपल्यासाठी काही जबाबदाऱ्‍या घेऊन आली. आपल्यासाठी सीमारेषा निश्चित करून आली. आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी समाजाच्या प्रत्येक वर्गाला, प्रत्येक घटकाला, भारताच्या प्रत्येक भूभागाला पुढे जाण्यासाठी समान संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने आपली राज्यघटना आपल्याला मार्गदर्शन करत असते.

माझ्या प्रिय बंधूभगिनींनो आपली राज्यघटना आपल्याला सांगत असते, भारताच्या तिरंगी झेंड्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते, गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, सर्व लोकांना पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे, आपला कनिष्ठ मध्यमवर्ग, मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्गाला प्रगती करताना कोणतेही अडथळे येता कामा नयेत, सरकारची अडचण येऊ नये, समाजव्यवस्थेने त्यांच्या स्वप्नांना दडपून टाकू नये, त्यांना जास्तीत जास्त संधी मिळाल्या पाहिजेत, त्यांना जितकी प्रगती करायची असेल, जितका विकास करायचा असेल तितका करण्यासाठी पोषक वातावरण असेल.

आपले ज्येष्ठ नागरिक, आपले दिव्यांग, महिलावर्ग, दलित पीडित शोषित वर्गाला, जंगलांमध्ये राहून उपजीविका करणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या आशा आकांक्षांनुसार पुढे जाण्याची संधी मिळेल. एक स्वावलंबी भारत असेल. एक बलशाली भारत असेल. विकासाच्या गतीत सातत्य राखणारा, यशाची नवी शिखरे गाठणारा भारत असेल. जगामध्ये भारताची पत असेल, केवळ इतकेच नाही तर आम्हाला असे वाटते की जगामध्ये भारताची चमक देखील असेल, अशा भारताची निर्मिती करण्याची आमची इच्छा आहे.

माझ्या प्रिय देशवासीयांनो मी यापूर्वी देखील माझ्या मनातील टीम इंडियाची संकल्पना तुमच्यासमोर मांडली आहे. जेव्हा सव्वाशे कोटी देशवासीयांची भागीदारी होते, देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिक आमच्याशी जोडला जातो, सव्वाशे कोटी स्वप्ने, सव्वाशे कोटी संकल्प, सव्वाशे कोटी पुरुषार्थ, जेव्हा निर्धारित लक्ष्यप्राप्तीसाठी योग्य दिशेने वाटचाल करू लागतात, तेव्हा काय होऊ शकत नाही?

माझ्या प्रिय बंधुभगिनींनो मी आज माझ्या संपूर्ण विनम्रतेने, मोठ्या आदराने हे नक्कीच सांगेन.  2014 मध्ये या देशाचे नागरिक केवळ सरकार बनवून थांबले नव्हते, ते केवळ सरकार बनवून थांबले नाहीत, तर देश घडवण्यासाठी देखील कामाला लागले आहेत, लागले होते आणि लागून राहतील. मला असे वाटते की हेच आपल्या देशाचे सामर्थ्य आहे. सव्वाशे कोटी देशवासी, भारतातील सहा लाखांपेक्षा जास्त गावे, आज अरविंद यांची जयंती आहे. अरविंद यांनी अतिशय योग्य गोष्ट सांगितली होती. अरविंद यांनी म्हटले होते की राष्ट्र काय आहे, आपली मातृभूमी काय आहे, ही केवळ जमिनीचा एक तुकडा नाही आहे, हे केवळ एक संबोधन नाही, ही कोणतीही कवीकल्पना नाही, राष्ट्र एक विशाल शक्ती आहे जी असंख्य लहान लहान घटकांना संघटित उर्जेचे मूर्त रुप देते. अरविंद यांची ही संकल्पनाच देशाच्या नागरिकांना देशाला पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देईल. मात्र, आपण पुढे जात आहोत हे आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण कुठून सुरुवात केली होती त्यावर आपली नजर जात नाही. आपण आपल्या प्रवासाची सुरुवात कुठून केली होती, त्याकडे आपण पाहिले नाही तर आपण कुठे चाललो किती चाललो याचा कदाचित अंदाज येणार नाही आणि म्हणूनच 2013 मध्ये आपला देश ज्या गतीने वाटचाल करत होता, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात 2013 ची गती होती. त्या 2013च्या गतीला जर आपण आधार मानून विचार केला आणि गेल्या चार वर्षात जी कामे झाली आहेत त्या कामांचा आपण जर आढावा घेतला तर  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशाची गती काय आहे, प्रगती काय आहे, कोणत्या गतीने देश वाटचाल करत आहे. शौचालयाच्या निर्मितीचेच उदाहरण घ्या ना, शौचालये बांधण्याची 2013 ची जी गती होती त्या गतीने जर चालत राहिलो असतो न जाणो किती दशके उलटून गेली असती, शौचालयांना शंभर टक्के पूर्ण करण्यामध्ये.

जर आम्ही गावांमध्ये वीज पोहोचवण्याविषयी बोलत असू आणि त्याबाबत 2013च्या आधारे विचार केला तर बघा एलपीजी गॅस कनेक्शन गरीबांना, गरीब मातेला धुरापासून मुक्ती देणारी शेगडी याबाबत जर 2013च्या गतीने वाटचाल केली असती तर ही कामे पूर्ण करायला कदाचित 100 वर्षे देखील कमी पडली असती. जर आपण 13 च्या गतीने ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारत राहिलो असतो तर ऑप्टिकल फायबर लावण्यामध्ये तर कदाचित काही पिढ्या लागल्या असत्या. हा वेग, ही गती ही प्रगती या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी आम्ही पुढे वाटचाल करत आहोत.

बंधु भगिनींनो देशाच्या अपेक्षा खूप आहेत, देशाच्या गरजा देखील अनेक आहेत आणि त्यांना पूर्ण करणे, सरकार असो, समाज असो, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, सर्वांनी एकजुटीने काम करणे अतिशय गरजेचे असते आणि त्याचाच हा परिणाम आहे, आज देशात पाहा कशा प्रकारचा बदल झाला आहे. देश तोच आहे, तीच भूमी आहे, हवा तीच आहे, आकाश तेच आहे, समुद्र तोच आहे, सरकारी कार्यालये तीच आहेत, फायली त्याच आहेत, निर्णय प्रक्रिया करणारे लोकही तेच आहेत. पण चार वर्षात देशात बदल दिसून येऊ लागला आहे. देशात एक नवी चेतना, नवी अपेक्षा, नवे संकल्प, नवा निर्धार, नवा पुरुषार्थ, त्याला पुढे घेऊन जात आहे आणि म्हणूनच तर आज देश दुप्पट महामार्ग बनवत आहे. देश चारपटीने गावात नवी घरे उभारत आहे. देश आज अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करत आहे तर देश मोबाईल फोनची देखील विक्रमी निर्मिती करत आहे. देशात आज ट्रॅक्टरची विक्रमी खरेदी होत आहे. गावातील शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करत आहेत, ट्रॅक्टर्सची विक्रमी खरेदी होत आहे. तर दुसरीकडे आज देशात स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात विमान खरेदी केली जात आहेत. देश आज शाळांमध्ये नवीन शौचालये  बनविण्याचा विक्रम करत आहे, तर देश आज नवीन आयआयएम, नवीन आयआयटी, नवीन एम्सची स्थापन करत आहे. देश आज छोट्या छोट्या ठिकाणी नवीन कौशल्य अभियानाला चालना देत नवनवीन कौशल्य केंद्रे स्थापन करत आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये स्टार्टअपची लाट आली आहे.

बंधू आणि भगिनींनो, भारत एकीकडे डिजिटल भारत बनवण्यासाठी काम करत आहे. तर दुसरीकडे माझ्या दिव्यांग बंधू-भगिनींसाठी सामायिक चिन्हाचा शब्दकोश बनवण्याचे काम तेवढ्याच तन्मयतेने आज देश करत आहे. देशातील शेतकरी सध्या आधुनिकता, वैज्ञानिकता जाणून घेण्यासाठी ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन, स्प्रिंकलर्स यावर काम करत आहेत. तर दुसरीकडे 99 जुने बंद पडलेले सिंचन प्रकल्प पुन्हा सुरु केले जात आहेत. आपल्या देशातील सैन्य कुठलेही नैसर्गिक आपत्ती असो, संकट असे, मैत्री, करूणा, मायेसह धावून जात आहे. मात्र हेच सैन्य जेव्हा संकल्प करते, तेव्हा लक्ष्यभेदी कारवाई करून शत्रूला नामोहरम करून येते.  हा आपला देश, विकासाचा कॅनव्हास किती मोठा आहे. मोठ्या कॅनव्हासवर मोठ्या उत्साहाने पुढे जात आहे.

मी गुजरातमधून आलो आहे. गुजरातमध्ये एक म्हण आहे. ‘निशाणा चूक माफ, लेकिन नही माफ निचु निशाणा’ म्हणजेच लक्ष्य मोठे असायला हवे, स्वप्ने मोठी असायला हवीत, त्यासाठी मेहनत करावी लागते, उत्तर द्यावे लागते. मात्र लक्ष्य मोठी नसतील, दूरची नसतील तर समाज जीवनाचे निर्णय होत नाहीत. विकास खुंटतो, म्हणूनच माझ्या बंधू भगिनींनो, आपल्यासाठी आवश्यक आहे कि नवीन उद्दिष्ट घेऊन, नवीन संकल्प घेऊन पुढे जायला हवे. जेव्हा लक्ष्य मोठे नसते, तेव्हा आवश्यक निर्णय देखील वर्षानुवर्षे होत नाहीत. या देशाचे अर्थतज्ज्ञ, शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, शेतकऱ्यांकडून मागणी होत होती की शेतमालाला उत्पादनाच्या दीडपट किमान हमी भाव मिळायला हवा, वर्षानुवर्षे चर्चा सुरु होती, फायली इथेतिथे जात होत्या, मात्र आम्ही निर्णय घेतला, दीडपट हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेतला.

जीएसटी, कोण सहमत नव्हते, सर्वांना जीएसटी हवे होते. मात्र निर्णय कुणी घेत नव्हते. निर्णय घेण्यात माझा लाभ, राजकारण, निवडणुका यांचा दबाव होता. आज माझ्या देशातील छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या मदतीने, खुलेपणाने नव्या गोष्टी स्वीकारण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आज देशाने जीएसटी लागू केला. व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला. देशातील व्यापार समुदायाला जीएसटी बरोबर सुरुवातीला अडचणी येऊनही त्यांनी ते स्वीकारले, देशाला पुढे नेले. आज बँकिंग क्षेत्राला ताकदवान बनवण्यासाठी दिवाळखोरी कायदा आहे, कुणी थांबवले होते, मात्र तो झाला नव्हता, त्यासाठी धाडस लागते, इच्छाशक्ती लागते, जनता जनार्दनासाठी समर्पित होण्याची वृत्ती लागते. बेनामी संपत्ती कायद्याचे उदाहरण घ्या, मनोबल उंच असते, देशासाठी काही करण्याची इच्छा असते, तेव्हा बेनामी संपत्ती कायदा लागू होतो. माझ्या देशाचे जवान 3-4 दशके अनेक वर्षे समान पद, समान वेतन मागणी करत होते. शिस्त असल्यामुळे आंदोलन करत नव्हते, मात्र आवाज उठवत होते. कुणी ऐकत नव्हते. कुणीतरी निर्णय घ्यायला हवा होता. तुम्ही ती जबाबदारी आमच्यावर सोपवली, आम्ही ती पूर्ण केली.

माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, आमच्याकडे कठोर निर्णय घेण्याचे सामर्थ्य आहे. कारण देशहिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पक्षहितासाठी काम करणारे आम्ही नाही. म्हणूनच आम्ही संकल्प केला आहे.

माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आम्ही हे कसे विसरू शकतो. आज जागतिक अर्थव्यवस्था कालखंडात संपूर्ण जग भारताकडे पाहत आहे, आशा-अपेक्षेने पाहत आहे. भारताच्या छोट्या-मोठ्या गोष्टींकडे जगाचे बारीक लक्ष आहे. तुम्ही आठवून पहा 2014 पूर्वी प्रसिद्ध तज्ञ काय म्हणायचे, तोही एक काळ होता विद्वान काय म्हणायचे भारतीय अर्थव्यवस्थेत जोखीम आहे.त्यांना धोका दिसायचा.  मात्र  त्याच व्यक्ती, त्याच संस्था आज  मोठ्या विश्वासाने म्हणत आहेत, सुधारणा मूलभूत अर्थव्यवस्थेला बळ  देत आहेत. कसा बदल घडला आहे पहा. एक काळ होता, घरात किंवा घराबाहेर, जग लाल फितीबद्दल बोलत होते. मात्र आज लाल गालिच्याबद्दल बोलले जात आहे. व्यवसाय सुलभतेत आपण 100 व्या स्थानावर पोहोचलो. आज संपूर्ण जग अभिमानाने भारताकडे पाहत आहे. एक काळ होता जेव्हा जग म्हणायचे भारत म्हणजे धोरण लकवा, भारत म्हणजे प्रलंबित सुधारणा, ते आपण ऐकत होतो, आज वृत्तपत्रे काढून पाहिली तर कळेल. मात्र आज जगातून एकच आवाज येत आहे भारत म्हणजे रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म, एकापाठोपाठ एक धोरणात्मक कालबद्ध निर्णयांची मालिका, तोही  एक काळ होता, जेव्हा जग नाजूक पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारताची गणना करत होते, जगाला चिंता वाटत होती,जगाला बुडवण्यात भारत योगदान देत आहे.  नाजूक पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारताची गणना होत होती. मात्र आज जग म्हणत आहे भारत मल्टि ट्रिलियन डॉलर्सचे  गुंतवणुकीचे  केंद्र बनले आहे. तिथूनच आवाज बदलला आहे.

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जग भारताबरोबर सहभागी होण्याची चर्चा करत आहे, आपल्या पायाभूत विकासाची चर्चा करत होती, कधी वीज गेल्यामुळे अंधार पडल्याची चर्चा व्हायची, ते दिवस आठवायचे,  बॉटलनेकची चर्चा होत होती. मात्र तेच लोक तेच जग, जगाला मार्गदर्शन करणारे लोक  आज  भारतासाठी म्हणत आहेत, झोपलेला हत्ती जागा झाला आहे, चालला आहे, धावत आहे. जगातील अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था म्हणत आहेत की आगामी तीन दशकांमध्ये 30 वर्षात भारत जगाच्या अर्थव्यवस्थेला गती देणार आहे. भारत जगाच्या  विकासाचा स्रोत होणार आहे असा विश्वास निर्माण झाला आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पत वाढली आहे. धोरण ठरवणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांमध्ये भारताला स्थान मिळाले आहे. भारताचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. भारत दिशा देण्यात नेतृत्व करण्यात भूमिका पार पाडत आहे. भारताचा आवाज बुलंद झाला आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण बरेच वर्षांपासून ज्या संस्थांमधल्या सदस्यत्वाची वाट पाहत होतो, आज अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आपल्याला स्थान मिळाले आहे. आज भारत पर्यावरण, जागतिक तापमानवाढ याची चिंता करणाऱ्यांसाठी आशेचा किरण बनला आहे, भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नेतृत्व करत आहे. आज कोणीही भारतीय जगात कुठेही जातो तेव्हा त्याचे प्रत्येक देशात स्वागत केले जाते. त्याच्या डोळ्यात चेतना जागी होते, भारताप्रती, भारताच्या पारपत्राची ताकद वाढली आहे. भारतींयाच्या विश्वासाने एक नवीन ऊर्जा एक नवीन उमंग घेऊन पुढे जात आहे.   

माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, जगात कुठेही माझा भारतीय संकटात असेल तर त्याला खात्री आहे कि माझा देश माझ्या पाठीशी उभा राहील. माझा देश संकट समयी माझ्या मागे उभा राहील. आणि इतिहास साक्ष आहे गेल्या काही दिवसातील घटना  आपण पाहिल्या आहेत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, जगाने  जसा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, तसाच भारतात ईशान्य भारताबद्दल चर्चा व्हायची, ज्या बातम्या यायच्या, तेव्हा वाटायचे अशा बातम्या न आलेल्या बऱ्या, मात्र आज माझ्या बंधू भगिनींनो, ईशान्य भारत  अशा बातम्या घेऊन येत आहे, ज्यामुळे देशाला प्रेरणा मिळत आहे. आज खेळाच्या मैदानात पहा, आपल्या ईशान्येची चमक दिसून येत आहे.

माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, आज ईशान्येतून बातम्या येत आहेत की तिथल्या शेवटच्या गावापर्यंत वीज पोहचली आणि संपूर्ण गाव रात्रभर नाचत होता. आज ईशान्येतून बातम्या येत आहेत की आज ईशान्येत हायवे, रेल्वे, एअरवे, वॉटरवे आणि आय वे विकसित झाल्याच्या बातम्या येत आहेत. ईशान्येत आज विजेच्या पारेषण लाईन्स उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. आज आपले युवक बीपीओ उघडत आहेत, नवीन शिक्षण संस्था बनत आहेत, आज आपला ईशान्य सेंद्रीय शेतीचे केंद्र बनत आहे. आज आपला ईशान्य भारत क्रीडा विद्यापीठाचे यजमानपद भूषवत आहे.

बंधू भगिनींनो, एक काळ होता जेव्हा त्यांना वाटायचे दिल्ली खूप दूर आहे, मात्र गेल्या चार वर्षात आम्ही दिल्लीला त्यांच्या जवळ आणले.

बंधू भगिनींनो, आज आपल्या देशाची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाची आहे आपल्याला आपल्या युवा पिढीचा अभिमान वाटतो. आपल्या देशातील युवकांनी आज सगळे आर्थिक मापदंड बदलले, प्रगतीच्या सर्व मापदंडांमध्ये नवे रंग भरले. कधी मोठ्या शहरांची चर्चा व्हायची. आज आपला देश दुसऱ्या तिसऱ्या श्रेणीतील शहरांची चर्चा करत आहे. कधी गावात गेलेल्या आधुनिक शेती करणाऱ्या तरुणांची चर्चा होत आहे. आपल्या देशातील तरुणांनी रोजगाराचे स्वरूप बदलले. स्टार्टअप असेल, बीपीओ असेल, ई-कॉमर्स असेल, मोबिलिटी असेल, कुठलेही क्षेत्र असेल, नवीन क्षेत्रात आज आपला युवक भारताला नव्या उंचीवर नेत आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 13 कोटी मुद्रा कर्जे ही मोठी गोष्ट आहे. 13 कोटी आणि त्यापैकी 4 कोटी असे तरुण आहेत ज्यांनी आयुष्यात प्रथमच कर्ज घेतले आहे, आज ते आपल्या पायावर उभे आहेत. हे बदलत्या वातावरणाचे जिवंत उदाहरण आहे. आज भारतातील गावांमध्ये डिजिटल भारताच्या स्वप्नाला चालना देण्यासाठी 3 लाख गावांमध्ये सामायिक सेवा केंद्रे माझ्या देशातील तरुण मुले-मुली चालवत आहेत. प्रत्येक गावाला, प्रत्येक नागरिकाला जगाशी जोडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करत आहेत.

माझ्या बंधू भगिनींनो, आज माझ्या  देशात पायाभूत विकासाने नवे रूप धारण केले आहे. देशाची गती असेल, रस्त्याची गती असेल, महामार्ग असेल, आयवे असेल, नवे विमानतळ असतील, एक प्रकारे आपला देश वेगाने पुढे जात आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशातील वैज्ञानिकांनीही देशाचे नाव उज्वल करण्यात कुठलीही कसर ठेवली नाही. जगाच्या संदर्भात आणि भारताच्या आवश्यकतेनुसार कुठल्या भारतीयाला अभिमान वाटणार नाही जेव्हा माझ्या वैज्ञानिकांनी 100 उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडून सगळ्यांना अचंबित केले. हे सामर्थ्य आपल्या वैज्ञानिकांचे आहे. आपल्या वैज्ञानिकांची कामगिरी  आहे. मंगळयानाचे यश, आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहचणे ही असामान्य कामगिरी होती. आगामी काळात आपल्या वैज्ञानिकांच्या कल्पना आणि प्रयन्तांतून आम्ही नाविक उपग्रह सोडणार आहोत. देशातील मच्छीमारांना, सामान्य नागरिकांना दिशादर्शनात यामुळे मदत होईल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज या लाल किल्ल्याच्या तटावरून मी देशवासियांना एक सुवार्ता देऊ इच्छितो, आपला देश अंतराळ क्षेत्रात प्रगती करत आहे. मात्र आपण स्वप्न पाहिले आहे, आपल्या वैज्ञानिकांनी स्वप्न पाहिले आहे. आपल्या देशाने संकल्प केला आहे की 2022, जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्षे होतील तेव्हा किंवा शक्य झाल्यास त्याआधी, देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करु तेव्हा, भारत मातेचे अपत्य मग मुलगा असेल किंवा मुलगी, कोणीही असु शकते, अंतराळात जाईल. हातात तिरंगा घेऊन जाईल. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी हे स्वप्न साकारायचे आहे. मंगळयानापासून भारताच्या शास्त्रज्ञांनी आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले आहे. आता मानवाला घेऊन गगनयान उड्डाण करेल आणि हे गगनयान अंतराळात जाईल, तेव्हा एका हिंदुस्तानीला घेऊन झेप घेईल. हिंदुस्तानचे वैज्ञानिक हे काम करतील. हिंदुस्तानच्या पुरुषार्थाद्वारे पूर्ण होईल. तेव्हा आपण मानवाला घेऊन अंतराळात जाणारा जगातला चौथा देश ठरणार आहोत.

बंधु-भगिनीनो, मी देशातल्या वैज्ञानिकांचे देशाच्या तंत्रज्ञानाचे या महान कार्यासाठी हार्दिक अभिनंदन करतो. बंधु-भगिनींनो, आज देश अन्नधान्याने समृद्ध आहे. कृषी क्रांतीला यशस्वीपणे पुढे नेल्याबद्दल मी शास्त्रज्ञांचे, तंत्रज्ञांचे अभिनंदन करतो.

मात्र बंधू भगिनींनो, आता काळ बदलला आहे. शेतकरी आणि कृषीबाजारालाही आज जागतिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. लोकसंख्या वाढ असो किंवा मग भूमीची कमतरता जाणवत असेल तरीही, अशावेळी आपली शेती आधुनिक बनवणे, शास्त्रीय बनवणे, तंत्रज्ञान-आधारित बनवणे ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आम्ही आमचे सगळे लक्ष कृषी क्षेत्र आधुनिक करण्यात, त्यात बदल करण्यात, त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी केंद्रीत केले आहे.

2022 पर्यत, म्हणजे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षापर्यत  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न आम्ही पहिले आहे. अनेकांनी त्याविषयी शंका व्यक्त केल्या आहेत. ते अगदी स्वाभाविक आहे. मात्र आम्ही एक लक्ष्य घेऊन वाटचाल करतो आहोत. आणि आम्ही लोण्यावर रेघ मारणाऱ्या लोकांपैकी नाही, तर पाषाणावर रेघ उमटणारे लोक आहोत. लोण्यावर तर कोणीही रेघ उमटवू शकेल. पण पाषाणावर रेघ कोरण्यासाठी घाम गाळावा लागतो, योजना बनवाव्या लागतात, त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. आणि म्हणूनच, जेव्हा स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळेपर्यत, देशाच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन, शेतीत आधुनिकता आणून, कृषीचा विस्तार करून आम्ही त्यात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करतो आहोत, मूल्यवर्धक करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कृषीउत्पादन देखील आज नव्या विक्रमी उंचीवर पोहोचले आहे. आणि पहिल्यांदाच आम्ही देशात कृषी निर्यात धोरणाच्या दिशेने पुढे वाटचाल करतो आहोत. कारण आपल्या देशातला शेतकरीही जागतिक बाजाराच्या स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी उभा रहावा, असा आमचा प्रयत्न आहे.

नवी कृषी क्रांती, जैव शेती, नीलक्रांती, मधुक्रांती, सौर उर्जा, ही नवी क्षेत्रे आता उघडली आहेत. ही क्षेत्रे पादाक्रांत करत आम्ही पुढे वाटचाल करु इच्छितो.

ही अत्यंत आनंदाची बाब आहे की आज आमचा देश मत्स्यउत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे आणि लवकरच तो पहिल्या क्रमांकावरही पोहोचेल. आज मधाची निर्यात दुप्पट झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऐकून आनंद होईल, की आमच्या देशात इथेनॉलचे उत्पादन तिपटीने वाढले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत, जेवढे महत्व कृषीक्षेत्राचे आहे, तेवढेच, महत्व संलग्न उद्योगांचेही आहे. आणि म्हणूनच आम्ही महिला बचतगटांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या उलाढालीतून, ग्रामीण संसाधनांचे सामर्थ्य अधिक वाढवतो आहे, ग्रामीण जीवनाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत.

खादीसोबत पूज्य महात्मा गांधींचे नाव जोडलेलं आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यत खादीविक्रीच्या व्यवसायाची जी परंपरा होती, त्यात मी नम्रपणे सांगू इच्छितो, की आज खादीविक्री आधीपेक्षा दुपटीने वाढली आहे. त्यामुळे गरिबांच्या रोजगारात वाढ झाली आहे, उत्पन्नात वाढ झाली आहे.

माझ्या बंधू-भगिनिनो, माझ्या देशातला शेतकरी आज सौरउर्जेवरही भर देतो आहे. शेतीच्या व्यतिरिक्त, तो या सौरशेतीतून मिळालेली ऊर्जा विकूनही उत्पन्न मिळवतो आहे. आमचे हातमाग चालवणारे कारागीरही आज जास्त उत्पन्न मिळवू लागले आहेत.

बंधू-भगिनींनो, आमच्या देशात आर्थिक विकास होत असेल, आर्थिक समृद्धी आली असेल तरीही, या सगळ्याच्या पलिकडे माणसाची प्रतिष्ठा सर्वोच्च स्थानी असते. मानवाच्या प्रतिष्ठेविना, देश संतुलित राहू शकत नाही, प्रगती करु शकत नाही. आणि म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याचा सन्मान त्याला मिळवून देणाऱ्या योजना आपण राबवल्या पाहिजेत. जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आपले आयुष्य सन्मानाने जगू शकेल. सरकारची धोरणे, कार्यपद्धती आणि नियत अशी असावी ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपले आयुष्य सन्मानाने जगण्याची संधी मिळेल.

आणि म्हणूनच, आम्ही उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या घरी स्वयंपाकाचा गॅस पोहचवला, सौभाग्य योजनेद्वारे गरिबांच्या घरी वीज पोहोचवण्याचे काम करतो आहोत. श्रमेव जयतेवर भर देत आम्ही पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो आहोत.

कालच आपण सर्वांनी, आपल्या माननीय राष्ट्रपतींनी देशाला उद्देशून दिलेला संदेश ऐकला. त्यांनी अत्यंत विस्तारपूर्वक ग्रामस्वराज्य अभियानाचे आपल्या भाषणात वर्णन केले आहे. कारण जेव्हा, सरकार विषयी चर्चा होते, तेव्हा म्हंटले जाते की धोरणे तर तयार होतात, मात्र शेवटच्या माणसापर्यत त्याची अंमलबजावणी होत नाही. काल रात्री राष्ट्रपतींनी अत्यंत सविस्तर वर्णन केले की कशाप्रकारे देशातल्या 65 हजार विकासआकांक्षित जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजना मागासलेल्या गावातल्या गरिबांच्या घरापर्यत प्रभावीपणे पोहोचवण्यात आल्या आहेत.

माझ्या प्रिय देशबांधवानो, 2014 साली जेव्हा याच लालकिल्यावरुन मी स्वच्छतेचा संकल्प जाहीर केला होता, तेव्हा काही लोकांनी त्याची थट्टा केली होती, उपहास केला होता. काही लोकांनी असेही म्हंटले होते की सरकारला आणखी अनेक महत्वाची कामे असतात, या स्वच्छतेसारख्या विषयात आपली उर्जा का खर्च करायची? मात्र, बंधू-भगिनीनो, काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचा एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात असे म्हंटले आहे की भारतात, स्वच्छता अभियानामुळे, 3 लाख मुलांचे प्राण वाचले आहेत. जर हे स्वच्छता अभियान नसते तर विविध आजारांमुळे 3 लाख मुलांचा बळी गेला असता. कुठला भारतीय नागरिक असेल, ज्याला या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन, या तीन लाख मुलांचे प्राण वाचवण्याचे पुण्य कमवण्याची संधी मिळाली नसेल? गरिबांच्या 3 लाख मुलांचे प्राण वाचवणे किती मोठे मानवतेचे कार्य आहे.जागतिक संस्था आज त्याची दखल घेत आहेत.

बंधू- भगिनीनो, पुढचे वर्ष महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष आहे. पूज्य बापूंनी आपल्या जीवनात स्वातंत्र्यापेक्षाही अधिक महत्त्व स्वच्छतेला दिले होते. ते म्हणत असे, सत्याग्रहींमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, आणि स्वच्छाग्रहींमुळे आपल्याला स्वच्छ भारताची भेट मिळणार आहे. गांधीजीनी सत्याग्रही तयार केले होते आणि गांधीजींच्या प्रेरणेने स्वच्छाग्रही तयार होत आहेत. आणि जेव्हा आपण त्यांची दीडशेवी जयंती साजरी करू, तेव्हा आमचे हे कोट्यवधी स्वच्छाग्रही पूज्य बापूंना स्वच्छ भारताची आदरांजली भेट देतील. आणि जे स्वप्न त्यांनी पहिले होते, ते स्वप्न पूर्ण करतील.

माझ्या बंधु-भगिनींनो, हे खरे आहे, की स्वच्छतेमुळे तीन लाख लोकांचे आयुष्य वाचले आहे. मात्र कितीही सुखी मध्यमवर्गीय कुटुंब असले तरीही, चांगली कमाई करणारी व्यक्ती असू देत, की गरीब असू देत, एकदा घरात आजारपण आले की ती व्यक्ती नाही पूर्ण कुटुंब आजारी पडते आणि पिढ्यानपिढ्या आजारापणाच्या दुष्टचक्रात अडकतात.

देशातील गरीबातल्या गरीब व्यक्तीला, सर्वसामान्य माणसाला, आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी, गंभीर आजारांवर मोठ्यात मोठ्या रुग्णालयात सर्वसामान्य माणसाला आरोग्यसुविधा मोफत मिळाव्यात यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री जनआरोग्य अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअतंर्गत, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ह्या देशातील दहा कोटी कुटुंब, ही सुरुवात आहे, येत्या काही दिवसात, निम्न मध्यमवर्ग, मध्यमवर्ग आणि उच्च-मध्यमवर्गातील लोकांनाही याचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून दहा कोटी कुटुंबांना म्हणजे जवळपास पन्नास कोटी लोकांना वार्षिक 5 लाख रुपयांचा आरोग्यविमा मिळणार आहे. हे आम्ही या देशाला देणार आहोत, कारण ही तंत्रज्ञान आधारित व्यवस्था आहे. त्यात पारदर्शकतेवर भर असेल, सर्वसामान्य माणसालाही याचा लाभ घेतांना काहीही अडचण यायला नको यासाठी, तंत्रज्ञानाचा वापर खूप महत्वाचा आहे. यासाठी तंत्रज्ञानाची साधने बनली आहेत. आज 15 ऑगस्टपासून येत्या 4-5 आठवड्यात देशाच्या कानाकोपऱ्यात या तंत्रज्ञानाची प्रायोगिक चाचणी सुरु होणार आहे. आणि तंत्रज्ञान निर्दोष करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतर ही योजना पुढे नेण्यासाठी 25 सप्टेंबरला, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधत पूर्ण देशात ही योजना लागू केली जाईल. या योजनेमुळे  देशातील गरीब जनतेला आरोग्य समस्यांचा सामना करावा लागणार नाही. त्याला सावकारांकडून  व्याजाने पैसे घ्यावे लागणार नाही, त्याचे कुटुंब उद्‌ध्वस्त होणार नाही. आणि देशातही मध्यमवर्गासाठी, नवतरुणांसाठी आरोग्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. द्वितीय, तृतीय श्रेणीच्या शहरात, नवीन दवाखाने उघडले जातील. खूप मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज पडेल. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.

बंधू-भगिनीनो, कुठल्याही गरिबाला जन्मभर दारिद्र्यात जगण्याची इच्छा नसते. कुठल्याही गरिबाला गरिबीत मरण्याची इच्छा नसते. कुठल्याच गरिबाला आपल्या मुलांना दारिद्र्याचा वारसा देऊन जाण्याची इच्छा नसते. दारिद्र्यातून बाहेर पडण्यासाठी आयुष्यभर त्याची धडपड सुरु असते आणि या संकटातून बाहेर येण्यासाठी एकच उपाय आहे ,एकच उपचार आहे, तो म्हणजे, गरिबांना सशक्त बनवणे!!

गेल्या चार वर्षात आम्ही गरीबांना सशक्त बनवण्यावर भर दिला आहे. गरीब सशक्त व्हावेत असा आमचा प्रयत्न आहेत. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच एक अत्यंत चांगला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की गेल्या दोन वर्षात, भारतात पाच कोटी गरीब जनता दारिद्रयरेषेच्या वर आली आहे.

बंधू आणि भागीनींनो, जेव्हा आपण गरिबांना सक्षम करण्याचे काम करतो आणि जेव्हा मी आयुष्मान भारताबद्दल बोलतो, तेव्हा दहा कोटी कुटुंब म्हणजे नेमके काय, 50 कोटी लोक म्हणजे काय, ह्यावरून कदाचित योजनेचा व्यापकतेचा अंदाज कदाचित खूप कमी लोकांना आला असेल. पण जर मी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोची लोकसंख्या एकत्र केली तर या एकूण लोकसंख्येच्या जवळपास संख्येइतके आयुष्मान भारताचे लाभार्थी असतील! जर पूर्ण युरोपची लोकसंख्या बघितली तर त्या लोकसंख्येइतके लोक आयुष्मान भारताचे लाभार्थी असतील.

बंधू-भगिनीनो, गरिबांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही अनेक योजना बनवल्या आहेत. योजना अनेक बनतात, मात्र दलाल, मध्यस्थ कंपन्या त्यातून मलिदा खातात आणि गरिबांना त्यांचा हक्क मिळत नाही. तिजोरीतून पैसा जातो, मात्र योजना कागदावरच राहते आणि देश लुटला जातो. गरिबांना त्यांचा हक्क मिळत नाही. सरकार याकडे कानाडोळा करू शकत नाही, आणि मी तर अजिबात नाही.

आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो, आपल्या व्यवस्थेत असलेल्या ह्या विकृतीचे निर्दालन करून देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणे अतिशय आवश्यक आहे. आणि ही जबाबदारी केंद्र, राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून पार पाडली पाहिजे. हे काम पुढे न्यायला हवे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, जेव्हापासून आम्ही हे “सफाई अभियान” सुरु केले आहे, गळती बंद करण्याचे काम सुरु केले आहे, तेव्हापासून एक बदल झाला. आधी सरकारी योजनांचे 6 कोटी असे लाभार्थी होते, कोणी उज्जवला योजनेचा लाभार्थी, ज्याच्याकडे बनावट कार्ड होते, कोणी रेशनकार्डाचे लाभार्थी होते, कोणी शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी, कोणी निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, पण हे 6 कोटी लोक असे होते, जे कधी जन्मालाच आले नाही, ज्यांचे कुठे अस्तित्वच नव्हते, मात्र तरीही त्यांच्या नावाने पैसे जात होते. ही 6 कोटी बनावट नावे वगळणे किती कठिण काम होते.. जी व्यक्ती कधी जन्मालाच आली नाही, जिचे या पृथ्वीवर काही अस्तित्वच नाही अशा लोकांची खोटी नावे लिहून पैसे लुबाडले जात होते, ह्या सरकारने हे थांबवले आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा हे सर्व थांबवण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलली आहेत.

बंधू-भगिनीनो, याचा परीणाम काय झाला याची तुम्हाला कल्पना आहे का? सरकारचे 90 हजार कोटी रुपये वाचले. 90 हजार कोटी.. ही छोटी रक्कम नाही. चुकीच्या पद्धतीने, चुकीचे काम केल्यामुळे जो पैसा चुकीच्या लोकांकडे जात होता, तो आज देशाच्या तिजोरीत वाचला आहे आणि देशातील सामान्य जनतेच्या भल्यासाठी त्याचा वापर होतो आहे. बंधू आणि भगिनीनो, हे का होते? हा देश गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारा देश आहे. आपल्या देशातील गरिबांना सन्मानाचे आयुष्य देण्यासाठी काम करणारा देश आहे. पण हे दलाल काय करायचे? तुम्हाला कदाचित माहित असेल, बाजारात एक किलो गव्हाची किंमत 24-25 रुपये आहे आणि हाच गहू सरकार 24-25 रुपयांना विकत घेऊन रेशनकार्डवर गरिबांना 2 रुपये किलो किमतीने देते.तांदळाची बाजारातली किंमत 30 ते 32 रुपये किलो, पण गरिबांना स्वस्त मिळावा म्हणून सरकार 30-32 रुपयांना खरेदी करून 3 रुपयांना विकते. रेशनच्या दुकानातून हा गहू गरीबांपर्यत पोहचवला जातो. जर एखाद्याने खोट्या नावावर, यातला एक किलो गहू जरी चोरला, तरी त्याला 20-25 रुपये सहज मिळायचे. एक किलो तांदूळ चोरला तर त्याला 30-35 रुपये असेच मिळत. म्हणूनच खोट्या नावांवर हा सगळा काळाबाजार चालत असे. आणि जेव्हा गरीब लोक रेशनच्या दुकानात धान्य घायला जात तेव्हा त्यांना धान्य संपले असे सांगितले जाई आणि त्यांना बाजारातून महाग धान्य विकत घ्यावे लागत असे. यातून गरीबांचा हक्क हिरावला जात असे. आम्ही हा बनावट काळाबाजार बंद केला आहे.

बंधू आणि भगिनींनो, देशातील कोट्यवधी गरिबांना 2 रुपये 3 रुपये किंमतीने धान्य मिळते. सरकार त्यावर, कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. पण याचे श्रेय सरकारला नाही. आणि मी आज विशेषत्वाने माझ्या देशातील प्रामाणिक करदात्यांना सांगू इच्छितो की आज जेव्हा तुम्ही दुपारी जेवायला बसाल,  तेव्हा एक क्षण आपल्या कुटुंबाला सांगा... मी आज देशातल्या प्रामाणिक करदात्यांच्या हृदयाला स्पर्श करणार आहे, त्यांना नमन करतो आहे... बंधू-भगिनीनो, जेव्हा एक प्रामाणिक करदाता कर भरतो, तेव्हा त्या पैशातून ह्या योजना राबवल्या जातात. ह्या सगळ्या योजनांचे श्रेय कोणाला द्यायचे असेल, तर ते सरकारला नाही, ह्या प्रामाणिक करदात्यांना आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही जेवायला बसता, तेव्हा तुम्ही तुमच्या कराचा परिणाम म्हणून त्याचवेळी आणखी तीन गरीब कुटुंब सुद्धा जेवत असतात, याचे संपूर्ण श्रेय प्रामाणिक करदात्यांना आहे. तुमच्यामुळे गरिबांचे पोट भरते. देशात, कर न भरण्यासाठी जनतेला भडकवले जात आहे, पण जेव्हा करदात्यांना हे समजते की जेव्हा ते स्वत:च्या घरी वातानुकुलीत खोलीत बसलेले आहेत,  त्याचवेळी  त्यांनी भरलेल्या करातून तीन गरीब कुटुंबांचे पोट भरले जात आहे, आयुष्यात यापेक्षा मोठा आनंद, मोठे समाधान काय असू शकते? यापेक्षा मोठी पुण्याई काय असू शकेल?

बंधू आणि भगिनीनो, आज देशात, प्रामाणिकपणाचा उत्सव सुरु आहे. देशात 2013 पर्यत, प्रत्यक्ष कर भरणाऱ्या लोकांची संख्या चार कोटी होती. म्हणजे हा गेल्या 70 वर्षातल्या आपल्या कामांचा परिणाम होता, की देशात प्रत्यक्ष कर भरणाऱ्यांची संख्या केवळ 4 कोटी होती, पण बंधू आणि भगिनीनो, 2013 पर्यत 4 कोटीपेक्षाही कमी असलेल्या करदात्यांची संख्या आज जवळपास दुप्पट झाली आहे. आज ती पावणेसात कोटी इतकी झाली आहे.

तीन, साडेतीन, पावणेचार कोटी कुठे आणि पावणे सात कोटी कुठे.... हे इमानदारींच जिवंत उदाहरण आहे. देश ईमानदारीच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्याचे उदाहरण आहे. 70 वर्षात आपल्या देशात अप्रत्यक्ष कराशी जोडल्या गेलेल्या उद्योगपतींचा आकडा होता, 70 वर्षात 70 लाख. 70 वर्षात 70 लाख मात्र वस्तू आणि सेवा कर आल्यानंतर गेल्या एका वर्षात हा आकडा 70 लाखावरुन एक कोटी 16 लाखावर पोहोचला आहे. बंधु-भगिनींनो माझ्या देशातली प्रत्येक व्यक्ती आज ईमानदारीच्या उत्सवासाठी पुढे येत आहे. जे पुढे येत आहेत त्यांना मी नमन करतो. जे पुढे येऊ इच्छितात त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो. त्रासापासून मुक्त अभिमानदायी करदात्याचे जीवन घडवण्यासाठी देश कटिबद्ध आहे. मी करदात्यांना भरवसा देतो की, आपण देश घडवण्यासाठी योगदान देत आहात. आपल्या समस्या या आमच्या समस्या आहेत, आम्ही आपल्यासमवेत उभे आहोत कारण आपल्या योगदानाने आम्हाला देशाची प्रगती घडवायची आहे. म्हणूनच बंधु-भगिनींनो, काळा पैसा, भ्रष्टाचार याची आम्ही कदापी गय करणार नाही. कितीही संकटे आली तरी मी हा मार्ग सोडणार नाही, माझ्या बंधु-भगिनींनो कारण या गोष्टींनी देशाला एखाद्या वाळवीप्रमाणे पोखरले आहे. म्हणूनच आपण पाहिले असेल आता दिल्लीच्या गल्लीत सत्तादलाल दृष्टीला पडत नाहीत.

माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, काळ बदलला आहे. देशात काही लोक घरात बसून, सरकारचे हे धोरण बदलू, अमुक करु, तमुक करु असे म्हणत होते, त्यांचे सारे दरवाजे बंद झाले आहेत. बंधु-भगिनींनो, आपल्या नातलगांची वर्णी लावण्याचे प्रकार आम्ही संपुष्टात आणले आहेत. लाच घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. सुमारे तीन लाख संशयास्पद कंपन्यांना टाळे लागले आहे. त्यांच्या संचालकावर निर्बंध घालण्यात आले आहेत. बंधु-भगिनींनो, प्रक्रिया, पारदर्शी करण्यासाठी आम्ही ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. परिणामी आज पर्यावरण- एक काळ होता. पर्यावरणाशी संबंधित मंजूरी, भ्रष्टाचाराचा डोंगर चढुन गेल्यावर मिळत असे. बंधु-भगिनींनो, आम्ही ही प्रक्रिया पारदर्शी केली, ऑनलाईन केली कोणतीही व्यक्ती हे पाहू शकते. भारताच्या संसाधनांचा सदुपयोग व्हावा यासाठी आपण काम करु शकतो. बंधु-भगिनींनो, आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयात तीन महिला न्यायाधीश आहेत. कोणतीही भारतीय महिला आज अभिमानाने सांगू शकते की, सर्वोच्च न्यायालयात तीन महिला न्यायाधीश आज आपल्या देशाला न्याय देत आहेत. बंधु-भगिनींनो, मला अभिमान आहे की, स्वातंत्र्यानंतर ही पहिली कॅबिनेट आहे, ज्यामधे सर्वाधिक महिलांना स्थान मिळाले आहे. बंधु-भगिनींनो! मी आज या मंचावरुन देशाच्या बहादुर कन्यांना एक खुशखबर देऊ इच्छितो. भारतीय सशस्त्र सेनेत शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून नियुक्त महिला अधिकाऱ्यांना पुरुष समकक्ष अधिकाऱ्यांच्या प्रमाणेच पारदर्शी प्रक्रियेद्वारा स्थायी कमिशनची मी आज घोषणा करतो. गणवेशातल्या आमच्या लाखो कन्या आहेत, देशासाठी काही करु इच्छितात त्यांच्यासाठी आज मी ही भेट देत आहे. लाल किल्ल्याच्या तटावरुन देत आहे. देशाच्या महिला नव भारत निर्माणासाठी खांद्याला खांदा भिडवून कार्य करत आहेत. आपल्या माता भगिनींचा अभिमान, त्यांचे योगदान, त्यांचे सामर्थ्य आज देश अनुभवत आहे. शेतीपासून खेळाच्या मैदानापर्यंत आपल्या देशाच्या महिला हिंदुस्तानचा तिरंगा झेडा फडकवत आहेत.

बंधु-भगिनींनो, ईशान्य भारतातून हिंसक घटनांच्या फुटीरतावादाच्या बातम्या येत असत. बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुलाच्या घटना ऐकायला येत असत. मात्र आज सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा, जो तीन-तीन, चार-चार दशकापासून लागू होता. आज मला आनंद आहे की आपल्या सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारांच्या सक्रियतेमुळे केंद्र आणि राज्याच्या विकास योजनांमुळे, जनतेशी संवादाच्या प्रयत्नांमुळे आज अनेक वर्षांनी त्रिपुरा आणि मेघालय संपूर्णपणे सशस्त्रदल विशेष अधिकार कायद्यातून मुक्त झाला आहे.

अरुणाचल प्रदेशमधले काही जिल्हेही यातून मुक्त झाले आहेत. मोजक्याच जिल्ह्यात आता ही स्थिती राहिली आहे. नक्षलवाद देशात हिंसाचार घडवत आहे. हिंसक घटना, फरार होऊन जंगलात आश्रय घेणे, मात्र आपल्या सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, विकासाच्या नव-नव्या योजनांमुळे, जनतेला विश्वासात घेतल्यामुळे नक्षलप्रभावित 126 जिल्ह्यांची संख्या कमी होऊन 90 जिल्ह्यांवर आली आहे. आता वेगवान विकास होत आहे.

बंधू आणि भगिनींनो, जम्मू आणि काश्मीरबाबत अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे आणि तोच योग्य मार्ग आहे. त्याच मार्गावरून आपल्यला जायचे आहे. वाजपेयी म्हणाले होते- इन्सानियत, जम्हूरियत आणि काश्मिरीयत हे मूळ मुद्दे घेऊन आपण काश्मीरचा विकास करू शकतो-मग लडाख असो, जम्मू असो किंवा श्रीनगर खोरे असो, समतोल विकास व्हावा, समान विकास व्हावा, तिथल्या सामान्य माणसाच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, पायाभूत विकासाला चालना मिळावी आणि त्याचबरोबर बंधुभाव वाढीला लावण्याच्या भावनेने आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. आम्हाला हिंसेच्या मार्गावरून नव्हे तर स्नेहभावनेने माझ्या काश्मीरच्या देशभक्तीने जगणाऱ्या लोकांबरोबर पुढे जायचे आहे.

बंधू आणि भगिनींनो, सिंचन प्रकल्प पुढे जात आहेत. आयआयटी, आयआयएम, एम्सचे निर्माण कार्य वेगाने सुरु आहे. दल सरोवराच्या पुनर्निर्माणाचे कार्य, पुनरुद्धाराचे कार्य देखील आम्ही करत आहोत. सर्वात महत्वाचे म्हणजे, आगामी काळात जम्मू-काश्मीरमधील गावातील प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे गेले वर्षभर मागणी करत होती की तिथले पंच शेकडोंच्या संख्येने मला येऊन भेटत होते आणि ते मागणी करत होते की जम्मू-काश्मीरमध्ये आम्हाला पंचायतीच्या स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेऊ द्यात. काही ना काही कारणामुळे ते थांबले होते. मला आनंद आहे की येत्या काही महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये गावातील लोकांना आपला अधिकार वापरण्याची संधी मिळेल. स्वतः आपली व्यवस्था उभी करण्याची संधी मिळेल. आता तर भारत सरकारकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी थेट गावांकडे जातो, त्यामुळे गावाचा विकास करण्यासाठी तिथल्या निवडून आलेल्या पंचांकडे ताकद येईल. म्हणूनच नजीकच्या काळात पंचायतीच्या निवडणुका व्हाव्यात, स्थानीय महानगरपालिकांच्या निवडणुका व्हाव्यात, या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.

बंधू -भगिनींनो, आपल्याला देशाला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. आपला मंत्र आहे- 'सबका साथ-सबका विकास. कुठलाही भेदभाव नाही, तुझे-माझे नाही, आपपरभाव नाही, सर्वांची साथ म्हणजे सर्वांची साथ. आणि म्हणूनच आम्ही अशी उद्दिष्टे निश्चित करून चाललो आहोत. आणि आज मी पुन्हा एकदा या तिरंग्याखाली उभे राहून, लाल किल्ल्याच्या तटावरून कोट्यवधी देशवासियांना त्या  संकल्पांचा पुनरुच्चार करायला सांगू इच्छितो, त्या संकल्पांचा उद्‌घोष करू इच्छितो, ज्यासाठी आपण झटायला तयार आहोत.

आपणा भारतीयांकडे स्वतःचे घर असावे-हाऊसिंग फॉर ऑल, प्रत्येक घरात वीज जोडणी असावी - पॉवर फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला स्वयंपाकघरात धुरापासून मुक्ती मिळावी-कूकिंग गॅस फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला गरजेनुसार पाणी मिळावे-वॉटर फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला शौचालय मिळावे यासाठी-सॅनिटेशन फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला कौशल्य मिळावे यासाठी स्किल फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला चांगली आणि स्वस्त आरोग्यसेवा मिळावी यासाठी हेल्थ फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला सुरक्षा मिळावी, सुरक्षेचे विमा कवच मिळावे यासाठी इन्शुरन्स फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला इंटरनेट सेवा मिळावी यासाठी कनेक्टिविटी फॉर ऑल हा मंत्र घेऊन आम्हाला देश पुढे घेऊन जायचे आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, लोक माझ्याबद्दल बरेच काही बोलतात. मात्र जे काही बोलले जाते, मी आज सार्वजनिक रित्या काही गोष्टी स्वीकार करू इच्छितो की मी अधीर आहे कारण अनेक देश आपल्यापुढे निघून गेले आहेत, मी अधीर आहे कारण माझ्या देशाला मला या सर्व देशांच्या पुढे घेऊन जाण्यासाठी मी बेचैन आहे, मी बेचैन आहे, माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी अधीर देखील आहे, मी बेचैन देखील आहे. मी बेचैन आहे कारण आपल्या देशातील मुलांच्या विकासात कुपोषण एक मोठी समस्या आहे. एक खूप मोठा अडथळा आहे. मला माझा देश कुपोषणमुक्त करायचा आहे, यासाठी मी बेचैन आहे. माझ्या देशबांधवांनो, मी व्याकुळ आहे जेणेकरून गरीबांपर्यंत योग्य आरोग्य सुविधा पोहचाव्यात, यासाठी मी बेचैन आहे, जेणेकरून माझ्या देशातील सामान्य व्यक्तीही आजाराशी लढू शकेल, सामना करू शकेल.

बंधू-भगिनींनो, मी व्याकुळ देखील आहे, मी व्यग्र देखील आहे. मी व्यग्र आहे कारण आपल्या नागरिकाला दर्जेदार आयुष्य, सुलभ जीवनमान जगण्याची संधी मिळावी, त्यात सुधारणा व्हावी.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी व्याकुळ देखील आहे, मी व्यग्र देखील आहे. मी अधीर देखील व्यग्र आहे. कारण चौथी औद्योगिक क्रांती, जी ज्ञानाच्या अधिष्ठानावर चालणारी चौथी औद्योगिक क्रांती आहे त्याचे नेतृत्व आयटी क्षेत्र ज्यांच्या बोटांवर आहे, माझ्या देशाने त्याचे नेतृत्व करावे यासाठी मी अधीर आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी आतुर आहे कारण मला वाटते की देशाने आपली क्षमता आणि संसाधनांचा पूर्ण लाभ उचलावा आणि जगात अभिमानाने आपण पुढे जावे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपण जे आहोत, उद्या त्याहीपुढे आपल्याला जायचे आहे. आपल्याला थांबणे मंजूर नाही. आणि झुकणे तर आपल्या स्वभावातच नाही. हा देश थांबणार नाही, झुकणार नाही, थकणार नाही, आपल्याला नवी शिखरे गाठत पुढे जायचे आहे , उत्तरोत्तर प्रगती करत चालायचे आहे.

बंधू-भगिनींनो, वेदापासून वर्तमानापर्यंत जगाच्या चिरप्राचीन वारशाचे आपण धनी आहोत. आपल्यावर या वारशाचा आशीर्वाद आहे. तो वारसा जो आपल्या आत्मविश्वासामुळे आहे तो घेऊन आपण भविष्यात आणखी पुढे जाऊ इच्छितो. आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला केवळ भविष्य पाहायचे नाही तर भविष्यातील त्या शिखरावर देखील पोहचायचे आहे. भविष्यातील शिखराचे स्वप्न घेऊन आपल्याला चालायचे आहे आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला एक नवी आशा, एक नवा विश्वास, देश त्यावरच चालतो, देश त्यामुळेच घडतो आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, 

आपल्या मनात एक लक्ष्य घेऊन

आपल्या मनात एक लक्ष्य घेऊन

ध्येय आपले ठरवून

आपल्या मनात एक लक्ष्य घेऊन

ध्येय आपले प्रत्यक्ष घेऊन आपण तोडत आहोत बेड्या

आपण तोडत आहोत बेड्या

आपण बदलत आहोत चित्र

हे नवयुग आहे, हे नवयुग आहे

हा नवभारत आहे, हे नवयुग आहे,

हा नवभारत आहे.

 

" स्वतः लिहू आपले भविष्य, आम्ही  बदलत आहोत चित्र,

स्वतः लिहू आपले भविष्य,, हे नवयुग आहे, नवभारत आहे,

आम्ही चाललो आहोत, आम्ही चाललो आहोत पण करून

आम्ही चाललो आहोत पण करून, आपले तनमन अर्पण करून,

आपले तनमन अर्पण करून, जिद्द आहे, जिद्द आहे, जिद्द आहे,

एक सूर्य उगवायचा आहे, जिद्द आहे एक सूर्य उगवायचा आहे,

आकाशापेक्षा उंच जायचे आहे, आकाशापेक्षा उंच जायचे आहे,

एक नवीन भारत घडवायचा आहे, एक नवीन भारत घडवायचा आहे."

माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या पवित्र पर्वानिमित्त तुम्हा सर्वांना अनेक-अनेक शुभेच्छा, चला माझ्याबरोबर जय हिंदच्या मंत्रासह उच्च स्वरात माझ्याबरोबर म्हणा, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम,  वंदे मातरम,  वंदे मातरम,  वंदे मातरम,  वंदे मातरम .

 

 

 

  1. Gokhale/S.Tupe/S.Patil/S.Kane/R.Aghor/N.Chitale/D.Rane