७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांच्या भाषणाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
- आज देशात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. स्वप्नांच्या संकल्पासह प्रयत्नांची पराकाष्ठा करत देश नवी उंची गाठत आहे.
- स्वातंत्र्याचा हा सोहळा आपण त्या वेळी साजरा करत आहोत, ज्या वेळी आपल्या देशाच्या सुकन्या उत्तराखंड, हिमाचल, मणीपूर,तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातील आपल्या कन्यांनी सात समुद्र पार केले. सातही समुद्रांना तिरंग्याच्या रंगांनी रंगवून त्या आपल्यामध्ये परत आल्या आहेत.
- अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बालकांनी या वेळी एव्हरेस्टवर तिरंगा झेंडा फडकावून या तिरंगी ध्वजाची शान वाढवली आहे.
- दलित असो, पीडित असो, शोषित असो, वंचित असोत, महिला असोत, त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी संसदेने अतिशय जागरुकतेनं आणि संवेदनशीलतेनं सामाजिक न्याय अधिक बळकट केला आहे.
- ओबीसी अर्थात इतर मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यावेळी संसदेने मागासांना, अतिमागासांना त्यांच्या आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन, एक घटनात्मक व्यवस्था देऊन त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.
-अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या कुटुंबांनी आपल्या आप्तस्वकियांना गमावले आहे, ज्यांना संकटांचा सामना करावा लागला आहे, त्या सर्वांसाठी देश संपूर्ण ताकदीनिशी उभा आहे आणि ज्यांनी आपल्या आप्तस्वकियांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
- पुढल्या वेळच्या बैसाखीला जालियनवाला बागेतल्या नरसंहाराच्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. देशातील सामान्य लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावली होती आणि जुलुमाच्या परिसीमा विस्तारल्या होत्या, त्याची आणि आपल्या देशातील वीरांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण जालियनवाला बाग करून देते, आपल्याला प्रेरणेचा संदेश देते. मी त्या सर्व वीरांना हृदयपूर्वक आदरपूर्वक नमन करतो.
- भारत जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.
- आज देशवासीयांच्या वतीने स्वातंत्र्यासाठी त्याग करणाऱ्या या वीर सेनानींना मनापासून वंदन करतो, अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. ज्या तिरंगा ध्वजाची प्रतिष्ठा, मान-सन्मान आपल्याला जगण्याची, संघर्ष करण्याची आणि बलिदान करण्याची प्रेरणा देते, त्या तिरंग्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी देशाचे जवान प्राणांची आहुती देतात, निमलष्करी दले आयुष्य खर्ची घालतात. सर्वसामान्य माणसांच्या रक्षणासाठी पोलीस दले दिवसरात्र देशाच्या सेवेमध्ये कार्यतत्पर असतात.
- बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने एका समावेशक राज्यघटनेची निर्मिती केली. आपल्या या समावेशक राज्यघटनेने एका नव्या भारताची निर्मिती केली. आपल्यासाठी ही समावेशक राज्यघटना एका नव्या भारताचा संकल्प घेऊन आली.
- एक स्वावलंबी भारत, एक बलशाली भारत. विकासाच्या गतीत सातत्य राखणारा, यशाची नवी शिखरे गाठणारा भारत असेल. जगामध्ये भारताची पत असेल, जगामध्ये भारताची चमक देखील असेल, अशा भारताची निर्मिती करण्याची आमची इच्छा आहे.
- सव्वाशे कोटी स्वप्ने, सव्वाशे कोटी संकल्प, सव्वाशे कोटी पुरुषार्थ, जेव्हा निर्धारित लक्ष्यप्राप्तीसाठी योग्य दिशेने वाटचाल करू लागतात, तेव्हा काय होऊ शकत नाही?
- 2014 मध्ये या देशाचे नागरिक केवळ सरकार बनवून थांबले नाहीत, तर देश घडवण्यासाठी देखील कामाला लागले आणि लागून राहतील. मला असे वाटते की हेच आपल्या देशाचे सामर्थ्य आहे
-जर आम्ही गावांमध्ये वीज पोहोचवण्याविषयी बोलत असू आणि त्याबाबत 2013च्या आधारे विचार केला तर बघा एलपीजी गॅस कनेक्शन गरीबांना, गरीब मातेला धुरापासून मुक्ती देणारी शेगडी याबाबत जर 2013च्या गतीने वाटचाल केली असती तर ही कामे पूर्ण करायला कदाचित 100 वर्षे देखील कमी पडली असती. जर 2013 च्या गतीने ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारत राहिलो असतो तर ऑप्टिकल फायबर लावण्यामध्ये तर कदाचित काही पिढ्या लागल्या असत्या. हा वेग, ही गती ही प्रगती या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी आम्ही पुढे वाटचाल करत आहोत.
- चार वर्षात देशात बदल दिसून येऊ लागला आहे. देशात एक नवी चेतना, नवी अपेक्षा, नवे संकल्प, नवा निर्धार, नवा पुरुषार्थ, त्याला पुढे घेऊन जात आहे आणि म्हणूनच तर आज देश दुप्पट महामार्ग बनवत आहे. देश चारपटीने गावात नवी घरे उभारत आहे.
- देश आज अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करत आहे तर देश मोबाईल फोनची देखील विक्रमी निर्मिती करत आहे. देशात आज ट्रॅक्टरची विक्रमी खरेदी होत आहे.
- देशात स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात विमान खरेदी केली जात आहेत.
- देश आज नवीन आयआयएम, नवीन आयआयटी, नवीन एम्सची स्थापन करत आहे.
- देश आज छोट्या छोट्या ठिकाणी नवीन कौशल्य अभियानाला चालना देत नवनवीन कौशल्य केंद्रे स्थापन करत आहे.
- दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांमध्ये स्टार्टअपची लाट आली आहे.
- दिव्यांग बंधू-भगिनींसाठी सामायिक चिन्हाचा शब्दकोश बनवण्याचे काम तेवढ्याच तन्मयतेने आज देश करत आहे.
- कृषी क्षेत्रात आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. देशातील शेतकरी ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन, स्प्रिंकलर्स यावर काम करत आहेत.
- गेल्या चार वर्षात जी कामे झाली आहेत त्या कामांचा आपण जर आढावा घेतला तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की देशाची गती काय आहे, प्रगती काय आहे, कोणत्या गतीने देश वाटचाल करत आहे.
- 2013 ची जी गती होती त्या गतीने जर चालत राहिलो असतो न जाणो किती दशके उलटून गेली असती, शौचालयांना शंभर टक्के पूर्ण करण्यामध्ये.
- देशातील सैन्य कुठलेही नैसर्गिक आपत्ती असो, संकट असो , मैत्री, करूणा, मायेसह धावून जात आहे. तर दुसरीकडे लक्ष्यभेदी कारवाई करून शत्रूला नामोहरम करण्याची क्षमता देखील या सैन्यात आहे.
- नवीन उद्दिष्ट घेऊन, नवीन संकल्प घेऊन पुढे जायला हवे. जेव्हा लक्ष्य स्पष्ट नसतेतेव्हा प्रगती करणे शक्य नसते. आवश्यक निर्णय देखील वर्षानुवर्षे होत नाहीत.
- शेतमालाला चांगला भाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बहुतेक पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत दीडपट वाढ केली आहे.
- देशातील छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या मदतीने, खुलेपणाने नव्या गोष्टी स्वीकारण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आज देशाने जीएसटी लागू केला. व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला.
- मोठ्या धैर्याने आणि देशहिताच्या उद्देशाने बेनामी संपत्ती कायदा लागू झाला.
- तोही एक काळ होता विद्वान काय म्हणायचे भारतीय अर्थव्यवस्थेत जोखीम आहे. मात्र त्याच व्यक्ती, त्याच संस्था आज मोठ्या विश्वासाने म्हणत आहेत, सुधारणा मूलभूत अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत.
- एक काळ होता, जग लाल फितीबद्दल बोलत होते. मात्र आज लाल गालिच्याबद्दल बोलले जात आहे. व्यवसाय सुलभतेत देश 100 व्या स्थानावर पोहोचलो. आज संपूर्ण जग अभिमानाने भारताकडे पाहत आहे.
-एक काळ होता जेव्हा जग म्हणायचे भारत म्हणजे धोरण लकवा, भारत म्हणजे प्रलंबित सुधारणा. मात्र आज जगातून एकच आवाज येत आहे भारत म्हणजे रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म.
- तोही एक काळ होता, जेव्हा जग नाजूक पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारताची गणना करत होते. मात्र आज जग म्हणत आहे भारत मल्टि ट्रिलियन डॉलर्सचे गुंतवणुकीचे केंद्र बनले आहे.
- लोक आज भारतासाठी म्हणत आहेत, झोपलेला हत्ती जागा झाला आहे, चालला आहे, धावत आहे. जगातील अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था म्हणत आहेत की आगामी तीन दशकांमध्ये 30 वर्षात भारत जगाच्या अर्थव्यवस्थेला गती देणार आहे.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची पत वाढली आहे. भारत दिशा देण्यात नेतृत्व करण्यात भूमिका पार पाडत आहे. भारताचा आवाज बुलंद झाला आहे.
- आपण बरेच वर्षांपासून ज्या संस्थांमधल्या सदस्यत्वाची वाट पाहत होतो, आज अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आपल्याला स्थान मिळाले आहे. आज भारत पर्यावरण, जागतिक तापमानवाढ याची चिंता करणाऱ्यांसाठी आशेचा किरण बनला आहे, भारत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे नेतृत्व करत आहे.
- आज खेळाच्या मैदानात पहा, आपल्या ईशान्येची चमक दिसून येत आहे.
- ईशान्येतील शेवटच्या गावापर्यंत वीज पोहचली आहे.
- आज ईशान्येतून हायवे, रेल्वे, एअरवे, वॉटरवे आणि आय वे विकसित झाल्याच्या बातम्या येत आहेत.
- आज ईशान्येतील आपले युवक बीपीओ उघडत आहेत.
- आज आपला ईशान्य सेंद्रीय शेतीचे केंद्र बनत आहे. आज आपला ईशान्य भारत क्रीडा विद्यापीठाचे यजमानपद भूषवत आहे.
- एक काळ होता जेव्हा ईशान्येतील लोकांना वाटायचे दिल्ली खूप दूर आहे, मात्र गेल्या चार वर्षात आम्ही दिल्लीला त्यांच्या जवळ आणले.
- आज आपल्या देशाची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाची आहे. आपल्या देशातील तरुणांनी रोजगाराचे स्वरूप बदलले. स्टार्टअप असेल, बीपीओ असेल, ई-कॉमर्स असेल, मोबिलिटी असेल, कुठलेही क्षेत्र असेल, नवीन क्षेत्रात आज आपला युवक भारताला नव्या उंचीवर नेत आहे.
-13 कोटी मुद्रा कर्जे ही मोठी गोष्ट आहे. त्यापैकी 4 कोटी असे तरुण आहेत ज्यांनी आयुष्यात प्रथमच कर्ज घेतले आहे, आज ते आपल्या पायावर उभे आहेत. हे बदलत्या वातावरणाचे जिवंत उदाहरण आहे. आज भारतातील गावांमध्ये 3 लाख गावांमध्ये सामायिक सेवा केंद्रे माझ्या देशातील तरुण मुले-मुली चालवत आहेत. प्रत्येक गावाला, प्रत्येक नागरिकाला जगाशी जोडण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करत आहेत.
- आगामी काळात आपल्या वैज्ञानिकांच्या कल्पना आणि प्रयन्तांतून आम्ही नाविक उपग्रह सोडणार आहोत. देशातील मच्छीमारांना, सामान्य नागरिकांना दिशादर्शनात यामुळे मदत होईल.
- आपल्या देशाने संकल्प केला आहे की 2022 पर्यंत मानवाला घेऊन गगनयान उड्डाण करेल. तेव्हा आपण मानवाला घेऊन अंतराळात जाणारा जगातला चौथा देश ठरणार आहोत.
- आम्ही आमचे सगळे लक्ष कृषी क्षेत्र आधुनिक करण्यात, त्यात बदल करण्यात, त्याला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी केंद्रीत केले आहे. 2022 पर्यत, म्हणजे स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षापर्यत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न आम्ही पहिले आहे.
- देशाच्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन, शेतीत आधुनिकता आणून, कृषीचा विस्तार करून आम्ही त्यात आधुनिकता आणण्याचा मूल्यवर्धक करण्याचा प्रयत्न करतो आहोत. कारण देशातला शेतकरीही जागतिक बाजाराच्या स्पर्धेत पूर्ण ताकदीनिशी उभा रहावा, असा आमचा प्रयत्न आहे.
- नवी कृषी क्रांती, जैव शेती, नीलक्रांती, मधुक्रांती, सौर उर्जा, ही नवी क्षेत्रे आता उघडली आहेत. ही क्षेत्रे पादाक्रांत करत आम्ही पुढे वाटचाल करु इच्छितो.
- आज आमचा देश मत्स्यउत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
- आज मधाची निर्यात दुप्पट झाली आहे.
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऐकून आनंद होईल, की आमच्या देशात इथेनॉलचे उत्पादन तिपटीने वाढले आहे.
- ग्रामीण अर्थव्यवस्थेत, जेवढे महत्व कृषीक्षेत्राचे आहे, तेवढेच, महत्व संलग्न उद्योगांचेही आहे. आणि म्हणूनच आम्ही महिला बचतगटांच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांच्या उलाढालीतून, ग्रामीण संसाधनांचे सामर्थ्य अधिक वाढवतो आहे, ग्रामीण जीवनाची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत.
- खादीसोबत पूज्य महात्मा गांधींचे नाव जोडलेलं आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यत खादीविक्रीच्या व्यवसायाची जी परंपरा होती, त्यात मी नम्रपणे सांगू इच्छितो, की आज खादीविक्री आधीपेक्षा दुपटीने वाढली आहे.
- आपल्या देशातला शेतकरी आज सौरउर्जेवरही भर देतो आहे. शेतीच्या व्यतिरिक्त, तो या सौरशेतीतून मिळालेली ऊर्जा विकूनही उत्पन्न मिळवतो आहे.
- देशाचा आर्थिक विकास होत असेल, आर्थिक समृद्धी आली असेल तरीही, या सगळ्याच्या पलिकडे माणसाची प्रतिष्ठा सर्वोच्च स्थानी असते. मानवाच्या प्रतिष्ठेविना, देश संतुलित राहू शकत नाही, प्रगती करु शकत नाही. आणि म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याचा सन्मान त्याला मिळवून देणाऱ्या योजनांचे नियोजन करीत आहोत.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात, स्वच्छता अभियानामुळे, 3 लाख मुलांचे प्राण वाचले आहेत.
- गांधीजींनी सत्याग्रही तयार केले होते आणि गांधीजींच्या प्रेरणेने स्वच्छाग्रही तयार होत आहेत. आणि जेव्हा आपण त्यांची दीडशेवी जयंती साजरी करू, तेव्हा आमचे हे कोट्यवधी स्वच्छाग्रही पूज्य बापूंना स्वच्छ भारताची आदरांजली भेट देतील.
- देशातील गरीबातल्या गरीब व्यक्तीला, सर्वसामान्य माणसाला, आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी, गंभीर आजारांवर मोठ्यात मोठ्या रुग्णालयात आरोग्यसुविधा मोफत मिळाव्यात यासाठी, भारत सरकारने प्रधानमंत्री जनआरोग्य अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअतंर्गत, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कधीही व्यक्ती कुठल्याही रोगावर रुग्णालयात उपचार घेऊ शकते.
- दहा कोटी कुटुंबांना म्हणजे जवळपास पन्नास कोटी लोकांना वार्षिक 5 लाख रुपयांचा आरोग्यविमा मिळणार आहे.
- आम्ही या देशाला तंत्रज्ञान आधारित व्यवस्था आणि पारदर्शकता देणार आहोत. तंत्रज्ञानाचा वापर खूप महत्वाचा आहे. यासाठी तंत्रज्ञानाची साधने बनली आहेत.
- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अभियान 25 सप्टेंबर 2018 ला चालू करण्यात येणार असून सर्वसामान्य व्यक्ती दुर्धर रोगांवर इलाज घेऊ शकते.
- देशातही मध्यमवर्गासाठी, नवतरुणांसाठी आरोग्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. द्वितीय, तृतीय श्रेणीच्या शहरात, नवीन दवाखाने उघडले जातील. खूप मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज पडेल. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.
- गेल्या चार वर्षात आम्ही गरीबांना सशक्त बनवण्यावर भर दिला आहे. गरीब सशक्त व्हावेत असा आमचा प्रयत्न आहेत. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकताच एक अत्यंत चांगला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की गेल्या दोन वर्षात, भारतात पाच कोटी गरीब जनता दारिद्रयरेषेच्या वर आली आहे.
- जेव्हा एक प्रामाणिक करदाता कर भरतो, तेव्हा त्या पैशातून ह्या योजना राबवल्या जातात. ह्या सगळ्या योजनांचे श्रेय कोणाला द्यायचे असेल, तर ते सरकारला नाही, ह्या प्रामाणिक करदात्यांना आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही जेवायला बसता, तेव्हा तुम्ही तुमच्या कराचा परिणाम म्हणून त्याचवेळी आणखी तीन गरीब कुटुंब सुद्धा जेवत असतात, याचे संपूर्ण श्रेय प्रामाणिक करदात्यांना आहे.
- 2013 पर्यत 4 कोटीपेक्षाही कमी असलेल्या करदात्यांची संख्या आज जवळपास दुप्पट झाली आहे. आज ती पावणेसात कोटी इतकी झाली आहे.
- 70 वर्षात आपल्या देशात अप्रत्यक्ष कराशी जोडल्या गेलेल्या उद्योगपतींचा आकडा होता, 70 वर्षात 70 लाख. 70 वर्षात 70 लाख मात्र वस्तू आणि सेवा कर आल्यानंतर गेल्या एका वर्षात हा आकडा 70 लाखावरुन एक कोटी 16 लाखावर पोहोचला आहे.
- काळा पैसा, भ्रष्टाचार याची कदापिही गय करणार नाही. कितीही संकटे आली तरी मी हा मार्ग सोडणार नाही, कारण या गोष्टींनी देशाला एखाद्या वाळवीप्रमाणे पोखरले आहे. म्हणूनच आपण पाहिले असेल आता दिल्लीच्या गल्लीत सत्तादलाल दृष्टीला पडत नाहीत.
- प्रक्रिया, पारदर्शी करण्यासाठी आम्ही ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे.
- भारताच्या संसाधनांचा सदुपयोग व्हावा यासाठी आपण काम करु शकतो.
- भारतीय सशस्त्र सेनेत शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून नियुक्त महिला अधिकाऱ्यांना पुरुष समकक्ष अधिकाऱ्यांच्या प्रमाणेच पारदर्शी प्रक्रियेद्वारा नियुक्ती केली जाईल.
- सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारांच्या सक्रियतेमुळे केंद्र आणि राज्याच्या विकास योजनांमुळे, जनतेशी संवादाच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांनी त्रिपुरा आणि मेघालय संपूर्णपणे सशस्त्रदल विशेष अधिकार कायद्यातून मुक्त झाला आहे.
- जम्मू आणि काश्मीरबाबत अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे तोच योग्य मार्ग आहे. त्याच मार्गावरून आपल्याला जायचे आहे. जम्मू असो किंवा श्रीनगर खोरे असो, समतोल विकास व्हावा, समान विकास व्हावा, तिथल्या सामान्य माणसाच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, पायाभूत विकासाला चालना मिळावी, त्याचबरोबर बंधुभाव वाढीला लावण्याच्या भावनेने आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे.
- येत्या काही महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये गावातील लोकांना आपला अधिकार वापरण्याची संधी मिळेल. स्वतः आपली व्यवस्था उभी करण्याची संधी मिळेल. आता तर भारत सरकारकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी थेट गावांकडे जातो, त्यामुळे गावाचा विकास करण्यासाठी तिथल्या निवडून आलेल्या पंचांकडे ताकद येईल. म्हणूनच नजीकच्या काळात पंचायतीच्या निवडणुका व्हाव्यात, स्थानीय महानगरपालिकांच्या निवडणुका व्हाव्यात, या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.
- भारतीयांकडे स्वतःचे घर असावे-हाऊसिंग फॉर ऑल, प्रत्येक घरात वीज जोडणी असावी - पॉवर फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला स्वयंपाकघरात धुरापासून मुक्ती मिळावी-कूकिंग गॅस फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला गरजेनुसार पाणी मिळावे-वॉटर फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला शौचालय मिळावे यासाठी-सॅनिटेशन फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला कौशल्य मिळावे यासाठी स्किल फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला चांगली आणि स्वस्त आरोग्यसेवा मिळावी यासाठी हेल्थ फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला सुरक्षा मिळावी, सुरक्षेचे विमा कवच मिळावे यासाठी इन्शुरन्स फॉर ऑल, प्रत्येक भारतीयाला इंटरनेट सेवा मिळावी यासाठी कनेक्टिविटी फॉर ऑल हा मंत्र घेऊन आम्हाला देश पुढे घेऊन जायचे आहे.
B.Gokhale/S.Tupe/S.Kane/P.Kor