Responsive image

Press Information Bureau

Government of India

Prime Minister's Office

गुजरातमध्ये केवडिया येथे उभारण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या राष्ट्रार्पण कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On :31, October 2018 18:29 IST

 

मी सरदार पटेल असे म्हणतो, आपण सर्वांनी ‘अमर रहे, अमर रहे’ असं म्हणावं.

सरदार पटेल. अमर रहे, अमर रहे,

सरदार पटेल. अमर रहे, अमर रहे,

सरदार पटेल. अमर रहे, अमर रहे,

मला वाटतं, या इथे आणखी एक घोषणा मोठ्या स्वरामध्ये केली गेली पाहिजे. मी म्हणतो, ‘‘देश की एकता’’ आपण म्हणावे, ‘‘ जिंदाबाद, जिंदाबाद!’’

देश की एकता- जिंदाबाद जिंदाबाद!

देश की एकता- जिंदाबाद जिंदाबाद!

देश की एकता- जिंदाबाद जिंदाबाद!

देश की एकता- जिंदाबाद जिंदाबाद!

व्यासपीठावर उपस्थित असलेले गुजरातचे राज्यपाल श्री ओमप्रकाश कोहली जी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान विजय रूपाणीजी, कर्नाटकचे राज्यपाला श्रीमान वजुभाई वाला, मध्यप्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, संसदेमध्ये असलेले माझे सहकारी आणि राज्यसभेचे सदस्य अमितभाई शहा, गुजरातचे उप-मुख्यमंत्री नितीनभाई, विधानसभेचे सभापती राजेंद्र जी, देश-विदेशातून आज इथे उपस्थित असलेले सन्माननीय आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

माता नर्मदेच्या इथल्या पवित्र जलधारेच्या किनारी, सातपुडा आणि विंध्य पर्वतराजींमध्ये या ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे आणि देशवासियांचे, संपूर्ण जगभरामध्ये असलेल्या हिंदुस्तानींचे आणि या हिंदुस्तानवर प्रेम करणा-या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो.

आज संपूर्ण देश सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्मरणानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करीत आहेत. एकता दिनाचे औचित्य साधून आज देशाच्या कानाकोप-यामध्ये भारताच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी आमचे नवयुवक धावत आहेत. ‘रन फॅार युनिटी’मध्ये असंख्य लोक सहभागी होत आहेत. या सर्व सहभागीदारांना मी अभिवादन करतो. ही आपल्यामध्ये असलेली भारतभक्ती आहे. आणि याच भारतभक्तीच्या भावनेच्या जोरावर हजारो वर्षांपासून चालत आलेली सभ्यता, संस्कृती अधिक उदयास येत आहे. मित्रांनो, कोणत्याही देशाच्या इतिहासामध्ये असे काही क्षण येतात की, ते क्षण पूर्णतेचा अनुभव देतात. आज असाच एक क्षण आला आहे. कोणत्याही राष्ट्राच्या इतिहासामध्ये  असा क्षण कायमस्वरूपी एक विशिष्ट स्थान मिळवतो आणि मग या क्षणाचे हे विशिष्ट स्थान नष्ट करणे खूप अवघड असते. आजचा हा दिवस भारताच्या इतिहासातला असाच खूप काही महत्वाचे क्षण निर्माण करणारा, इतिहासामध्ये वेगळे स्थान निर्माण करणारा क्षण आहे. भारताचा एक वेगळा परिचय संपूर्ण जगाला करून देणारा, भारतासाठी सन्मानाचा, गौरवाचा क्षण आहे. भारतासाठी समर्पित आयुष्य वेचणा-या एका विराट, महान व्यक्तिमत्वाचा ज्याला योग्य स्थान मिळू शकले नाही, याविषयी मनात अपुरेपणाची भावना आपण सर्वांनी स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे मनात बाळगली होती. ही अपूरेपणाची भावना उराशी बाळगून आपण वाटचाल करीत होतो.

आज भारताच्या वर्तमानकाळाने आपल्या इतिहासातल्या एका स्वर्णिम पुरूषाचे महान कार्य सर्वांसमोर आणण्याचे काम केले आहे. आज ज्यावेळी या भूमीपासून ते आकाशापर्यंत सरदारसाहेबांवर अभिषेक होत आहे, त्यावेळी भारताने केवळ आपल्यापुरताच एक नवा इतिहास निर्माण केला आहे असे नाही, तर भविष्यासाठी प्रेरणा देणारा  एक गगनचुंबी आधारही तयार केला आहे. सरदारसाहेबांच्या या विशाल, महाकाय,बुलंद पुतळ्याचे राष्ट्रार्पण करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे सौभाग्य मानतो. ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होतो, त्यावेळी या स्मारकाची कल्पना मांडली होती परंतु पंतप्रधान या नात्याने आपल्यालाच एके दिवशी या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्याची संधी मिळेल, आपल्या हातूनच हे पुण्यकार्य होईल, अशी पुसटशी कल्पनाही मनात त्यावेळी नव्हती. सरदारसाहेबांकडून मिळालेला हा एकप्रकारचा आशीर्वादच आहे, असे मी मानतो. सरदारसाहेबांच्या या आशीर्वादाबद्दल, देशाच्या कोट्यवधी जनतेने दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी स्वतःला धन्य मानतो आहे. आज गुजरातच्या लोकांनी मला जे अभिनंदन पत्र दिले आहे, ते माझ्या मते केवळ अभिनंदन पत्र नाही. तर ज्या मातीमध्ये मी लहानाचा मोठा झालो,ज्या भूमीचे माझ्यावर संस्कार झाले आणि ज्याप्रमाणे एखाद्या आईने आपल्या मुलाच्या पाठीवर हात ठेवल्यानंतर त्या मुलाची ताकद, क्षमता, उत्साह हजारोपटींनी वाढतो, अगदी तसाच अनुभव मला आज या अभिनंदन, सन्मानपत्राच्या रूपाने मिळत आहे. मातेकडून आशीर्वाद मिळाल्याची अनुभूती मला आज येत आहे. लोखंड जमा करण्याच्या मोहिमेमध्ये आलेला पहिला लोखंडाचा तुकडाही आज माझ्याकडे सोपवण्यात आला आहे. ज्यावेळी अहमदाबादमध्ये आम्ही ही मोहीम सुरू केली होती, त्यावेळी फडकवण्यात आलेला ध्वज मला भेट म्हणून देण्यात आला आहे. मी आपल्या सर्वांविषयी, गुजरातच्या लोकांविषयी अतिशय कृतज्ञ आहे. आज मला दिलेल्या या वस्तू मी इथंच ठेवून जाणार आहे, म्हणजे तुम्हाला या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवता येतील आणि संपूर्ण देशालाही त्यांच्याबद्दल माहिती मिळेल.

मला आज त्या जुन्या दिवसांचे स्मरण होत आहे आणि असं वाटतं, मनात जे काही आहे, ते अगदी भरभरून, सर्व काही बोलावं, तुम्हाला सांगावं. देशभरातल्या शेतकरी वर्गाला त्यांच्या शेतातली माती आम्ही पहिल्यांदा मागितली, तो दिवस आज मला चांगलाच आठवतोय. शेतकरी बंधूंनी शेताच्या कामासाठी वापरलेल्या जुन्या औजारांचे, त्यांच्या भंगारातल्या लोखंडाचे सामान एकत्र करण्याचे काम आम्ही सुरू केले होते. त्यावेळी देशभरातल्या लाखो गावांतल्या कोट्यवधी शेतकरी कुटुंबानी स्वतःहून पुढे येवून या पुतळ्याच्या निर्माणाचे कार्य एक जनआंदोलन बनवले. त्यामुळे या शेतकरी बांधवांनी दिलेल्या लोखंडाच्या अवजारांमधून शेकडो मेट्रिक टन लोखंड काढण्यात आले आणि या पुतळ्यासाठी ठोस आधार तयार करण्यात आला.

मित्रांनो, या स्मारकाच्या निर्मितीचा विचार ज्यावेळी मी पहिल्यांदा काही लोकांसमोर मांडला, त्यावेळी शंका, आशंकांचे वातावरण तयार झाले होते, हेही मला चांगले आठवतेय. ज्यावेळी ही कल्पना मनात आकार घेत होती, त्यावेळी स्मारकासाठी जागा मी शोधत होतो. या भागातल्या डोंगरावर अशा जागेचा मी शोध घेत होतो, जिथे मला एखादा मोठ्ठा डोंगर हवा होता. त्या डोंगराला कोरून त्यामध्ये सरदार साहेबांची प्रतिमाबाहेर काढता येईल क ?, याचा विचार सुरू होता. त्यासाठी अनेक गोष्टी पडताळून पाहिल्या, परंतु अतिभव्य प्रतिमा कोरून काढण्याइतका  मोठा  आणि मजबूत डोंगर या भागात मिळणे अवघड आहे, हे लक्षात आल्यानंतर, मला विचार बदलावा लागला. या नव्‍यानं केलेल्‍या  विचारमंथनातून आज आपल्यासमोर स्मारकाचे जे रूप आहे, त्याने जन्म घेतला. या स्मारकाविषयी मी सातत्याने विचार करत होतो, आणि त्याविषयी लोकांशीही चर्चा-विनिमय करीत होतो. सगळ्यांकडून सल्ले घेत होतो. देशाच्या इतक्या मोठ्या, महत्वपूर्ण प्रकल्पामध्‍ये सहभागी झालेल्‍या, जोडल्या गेलेल्या सर्वांनी देशाच्या विश्वासाला एक सामर्थ्‍य दिले, एका शिखरापर्यंत पोहोचवले, याचा मला आज अतिशय आनंद होत आहे.

बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण जगातला हा सर्वात उंच पुतळा आहे. अवघ्या जगाला, आमच्या भावी पिढ्यांना हा पुतळा म्हणजे त्या व्यक्तीचे प्रचंड साहस, सामर्थ्‍य आणि संकल्पाचे स्मरण करून देत राहणार आहे. ज्या व्यक्तीने आपल्या भारतमातेला खंड-खंड होण्यापासून वाचवलं. भारतमातेचे तुकडे करण्याचा कट या व्यक्तीने अयशस्वी करण्याचे पवित्र कार्य केले. भारताविषयी त्या काळात अनेक शंका बोलून दाखवल्या जात होत्या, मात्र ज्या महापुरुषाने सर्व आशंका कायमच्या समाप्त करून टाकल्या. अशा महान लोह पुरुषाला, सरदार वल्लभ भाई पटेल यांना मी शतशः वंदन करतो.

मित्रांनो, सरदार साहेबांचे सामर्थ्‍य भारताच्या कामी अगदी महत्वाच्या वेळी आले. भारतमातेची विभागणी साडेपाचशेपेक्षा जास्त संस्थानांमध्ये झालेली होती. संपूर्ण जगामध्ये भारताविषयी अतिशय निराशा व्यक्त केली जात होती. आणि निराशावाद त्या काळातही होता. अशा निराशेच्या काळामध्ये सर्वांना आशेचा एकच किरण दिसत होता. तो आशाकिरण म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल होते. सरदार पटेल यांच्यामध्ये कौटिल्याची कूटनीती आणि शिवाजी महाराज यांचे शौर्य एकत्रित होते. त्यांनी 5 जुलै, 1947 रोजी सर्व संस्थानिकांसमोर भाषण केले होते. मला वाटतं, त्यावेळी सरदार साहेबांनी काढलेले उद्गार आजही सार्थ आहेत. सरदार साहेबांनी म्हटले होते की, विदेशी आक्रोशापुढे आपली, आपआपसातली  भांडणे, वैरभाव हेच आपल्या पराभवाचे मोठे कारण होते. आता आपण ही चूक पुन्हा करायची नाही. आपल्याला कुणाचे गुलामही व्हायचे नाही.

सरदार साहेबांच्या या संवादामुळे एकीकरणाच्या शक्तीचे महत्व लक्षात घेवून या राजे-राजवाड्यांनी आपल्या संस्थानांचे विलिनीकरण होवू दिले. आणि पाहता पाहता अवघा भारत एक झाला. त्यावेळी राजे -रजवाड्यांनी केलेला त्याग आपण विसरून कधीच चालणार नाही. त्यामुळेच माझे आणखी एक असे स्वप्न आहे की, या स्थानाजवळच, अगदी लागूनच आपल्या देशात पूर्वी असलेल्या साडे पाचशेंपेक्षा जास्त राजे, राजवाडे, संस्थानिक होते, त्यांची माहिती देणारे एक आभासी संग्रहालय तयार करण्यात यावे, कारण त्यांनी त्यावेळी त्याग करून संस्थानांच्या एकीकरणासाठी जी पावले उचलली, त्यामुळेच एकसंध भारत तयार झाला. त्याचे एक संग्रहालय असले पाहिजे. अशा संग्रहालयामुळे भावी पिढ्यांना इतिहास जाणून घेता येईल. आज लोकशाही पद्धतीमध्ये एखाद्या तहसीलाचा अध्यक्ष म्हणून निवडून येणे मोठे मानले जाते. समजा जर अशा अध्यक्षाला कोणी एक वर्षभर आधीच पद सोडून देण्यास सांगितले तर किती गोंधळ गहजब उडतो. या राजा-महाराजांनी तर अगदी पूर्वापार, अनेक पिढ्यांपासून  राज्य केले होते, त्यांनी आपल्या पूर्वजांच्या अनेक गोष्टी या देशाला दिल्या होत्या. हे आपण विसरू शकत नाही. त्यांचेही स्मरण कायम केले पाहिजे.

मित्रांनो, ज्या कमतरतेसाठी संपूर्ण जग आपल्यावर तोंडसुख घेत होते, त्याच गोष्टीला सरदार पटेल यांनी ताकद बनवली आणि पटेल यांनी देशाला एक नवा मार्ग दाखवला होता. त्याच मार्गावरून वाटचाल सुरू असताना संशयाच्या धुक्यामध्ये सापडलेला भारत आज संपूर्ण जगाशी आपल्या अटी-नियमांवर संवाद करत आहे. दुनियेतली सर्वात मोठी आर्थिक आणि सामरिक शक्ती बनण्याच्या दिशेने हिंदुस्तान पुढे वाटचाल करत आहे. जर हे शक्य झाले तर यामागे एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या त्या असामान्य व्यक्तिमत्वाचे, सरदार साहेबांचे खूप मोठे योगदान असेल. त्यांची खूप महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. कोणत्याही प्रकारचे कितीही दडपण असो, कितीही मतभेद असतील, तरीही प्रशासनामध्ये हुकमत कशी प्रस्थापित केली जाते. हे सरदार साहेबांनी प्रत्यक्ष करून दाखवले होते. कच्छपासून ते कोहिमापर्यंत आणि कारगिलपासून ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही जा, आपल्याला कुणीही अडवू-थांबवू शकत नाही. यामागे सरदारसाहेबाचे कार्य आहे. त्यांनी केलेल्या संकल्पामुळेच तर हे शक्य होवू शकले. सरदार साहेबांनी संकल्प केला होता म्हणून हे घडू शकले.

आज मला देशवासियांना भावनाविवश करायचे आहे. आता तुम्ही एक क्षणभर कल्पना करा की, सरदार साहेबांनी हे काम केले नसते, हा संकल्प केला नसता तर आज गिरचे सिंह आणि गिरचे वाघ पाहण्यासाठी, शिवभक्तांना सोमनाथाची पूजा करण्यासाठी, हैद्राबादचे चारमिनार पाहण्यासाठी आम्हा सर्व हिंदुस्तानी जनतेला व्हिजा घ्यावा लागला असता. जर सरदार साहेबांनी हा संकल्प केला नसता तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत थेट रेल्वेसेवेची कल्पनाही करता आली नसती. जर सरदार साहेबांनी संकल्प केला नसता तर नागरी सेवेसारखा प्रशासनिक पाया तयार करताना आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं असतं.

 

बंधू आणि भगिनींनो,

21 एप्रिल, 1947 रोजी ‘आॅल इंडिया अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस’ च्या प्रशिक्षणार्थी अधिकारी वर्गाला मार्गदर्शन करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटले होते आणि त्यांचे शब्द खूप महत्वाचे आहेत. आज जे कोणी आयएएस, आयपीएस, आयएफएस असतील, त्या प्रत्येकाने हे शब्द कायमचे स्मरणात ठेवले पाहिजेत. त्यावेळी सरदार साहेबांनी म्हटले होते की, आयसीएस म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस होते. मात्र त्यामध्ये कोणी इंडियन नव्हते की, सिव्हिल नव्हते आणि त्यामध्ये  सर्व्हिसची  म्‍हणजे सेवेची कोणती भावनाही नव्हती. त्यांनी ही स्थिती बदलण्याचे आवाहन युवकांना केले. त्यांनी नवयुवकांना सांगितलं की, त्यांनीच संपूर्ण पारदर्शकता ठेवून, पूर्ण विश्वासाने, इमानदारीने भारतीय प्रशासनिक सेवेचा गौरव वाढवण्यासाठी आता पुढे आलं पाहिजे. भारताच्या नवनिर्माणासाठी ही सेवा स्थापित केली पाहिजे. अशा पद्धतीने सरदारांच्या प्रेरणेतून सेवेची रचना केली गेली. त्यावेळी भारतीय प्रशासनिक सेवेची तुलना एखाद्या लोखंडी चैकटीबरोबर करण्यात आली.

बंधू आणि भगिनींनो, सरदार पटेल यांच्यावर देशाच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी अशा काळात देण्यात आली की, तो काळ म्हणजे भारताच्या इतिहासातला सर्वात अवघड होता. अशा कठीण काळात देशाच्या सर्व व्यवस्थांचे पुनर्निर्माण करण्याची जबाबदारी होती. त्याचबरोबर देशात कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होता. त्यामुळे कायद्याचे पालन करण्याची जबाबदारीही होती. अशा गंभीर परिस्थितीमधून देशाला बाहेर काढून आमच्या आधुनिक पोलिस व्यवस्थेसाठी एक अतिशय ठोस, मजबूत आधार तयार करण्याचे कार्य वल्लभभाईंनी केले. मित्रांनो, लोकशाहीमध्ये सामान्य लोकांना जोडण्याच्या कार्यात सरदार साहेब प्रत्येक क्षण समर्पित राहिले. महिलांनी भारताच्या राजकारणामध्ये सक्रिय योगदान द्यावे, तसे अधिकार महिलांना मिळावेत यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. ज्यावेळी देशामध्ये महिला-भगिनींना पंचायतीच्या आणि शहरामध्ये स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये सहभागी होवू शकत नव्हत्या, त्यावेळी महिलांच्याबाबतीत होत असलेल्या अन्यायाविषयी सरदार साहेबांनी आवाज उठवला होता. त्यांनी असे पावूल पहिल्यांदा उचलल्यामुळेच तर स्वातंत्र्याआधी काही दशके हा भेदभाव दूर करण्यासाठी एक मार्ग मोकळा झाला. सरदार साहेबांनी त्यावेळी महिलांच्या मूलभूत अधिकारांची जाणीव करून दिल्यामुळे आपल्या लोकशाहीमध्ये महिला एक प्रभावी हिस्सा बनू शकल्या.

मित्रांनो, आज हा पुतळा इथं उभारण्यात आला आहे तो सरदार पटेल यांच्याठायी असलेल्या प्रतिभा, पुरूषार्थ आणि परमार्थाची भावनेचे जीवंत प्रकटीकरण, उदाहरण आहे. ही प्रतिभा त्यांचे सामर्थ्‍य आणि समर्पण यांचा केला जाणार गौरव, सन्मान आहे. हा पुतळा नव भारताच्या नवीन आत्म विश्वासाची एक अभिव्यक्ती आहे. हा पुतळा भारताच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उपस्थित करणा-या मंडळींना आठवण देण्यासाठी आहे की, हे राष्ट्र शाश्वत होते, शाश्वत आहे आणि शाश्वत राहणार आहे.

हा पुतळा शेतकरी वर्गासाठी स्वाभिमानाचे प्रतीक आहे. ज्या शेतक-यांच्या शेतातून माती आणण्यात आली, ज्या शेतक-यांनी आपल्या जमिनीमध्ये शेती करताना वापरलेल्या औजारांच्या लोखंडामुळे या पुतळ्याचा पाया अधिक भक्कम आणि मजबूत बनवला आहे. त्यांच्यासाठी ही गर्वाची गोष्ट आहे. शेतकरी बंधू येणा-या प्रत्येक संकटाला मोठ्या धैर्याने तोंड देवून शेतामधून अन्न पिकवतो. त्यामध्ये त्याच्या भावना असतात. त्यांचा आत्मा असतो. हेच या पुतळ्यामध्येही उतरले आहे. हा पुतळा म्हणजे आदिवासी बंधू-भगिनींनी दिलेल्या योगदानाचे स्मारक आहे. ज्या आदिवासींनी स्वातंत्र्य आंदोलनापासून ते आजपर्यंतच्या  विकास यात्रेमध्ये आपले बहुमूल्य योगदान दिले, त्याचे हे स्मारक आहे. हा प्रचंड उंचीचा भव्य आणि मजबूत पुतळा भारतामधल्या यूवकांचे प्रेरणास्थान बनणार आहे. भविष्यामध्ये भारतीय युवकांच्या आशा आकांक्षा या पुतळ्याप्रमाणेच विराट असतील. या आकांक्षांच्या पूर्ततेचे सामर्थ्‍य आणि मंत्र फक्त एक आणि एकच आहे, तो म्हणजे- ‘एक भारत श्रेष्ठ भारत’, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’,‘एक भारत श्रेष्ठ भारत’!

मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे आमच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या सामथ्र्याचेही प्रतीक आहे. गेल्या जवळपास साडेतीन वर्षांमध्ये दररोज सरासरी अडीच हजार कामगार आणि शिल्पकारांनी हे कार्य अगदी ‘मिशन मोड’ वर पूर्ण केले. आता थोड्या वेळातच ज्यांचा सत्कार इथं करण्यात येणार आहे, त्यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली आहे. देशातले असे नामवंत शिल्पकार श्रीमान राम सुतार जी यांच्या देखरेखीखाली देशातल्या अद्भूत शिल्पकारांच्या समुहाने कलेच्या या गौरवशाली स्मारकाचे काम पूर्ण केले आहे. मनामध्ये एक ‘मिशन’ची भावना असेल, राष्ट्रीय एकतेसाठी समर्पण आणि भारतभक्ती असेल तर त्याच्या बळावरच इतक्या कमी कालावधीमध्ये असे भव्य काम पूर्ण होवू शकले. सरदार सरोवर धरणाचा शिलान्यास कधी झाला आणि त्याचे काम किती दशकांच्यानंतर झाले, उद्घाटन किती वर्षांनी झाले, हे  तुम्हाला माहितीही आहे. आणि सरदार साहेबांच्या या स्मारकाचे काम तर तुमच्यासमोर, अगदी पाहता पाहता पूर्ण झाले. या महान कार्यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक कामगार, प्रत्येक कारागीर, प्रत्येक शिल्पकार, प्रत्येक अभियंता, या कार्यात योगदान देणा-या प्रत्येकाचे, मी आदरपूर्वक अभिनंदन करतो. सर्वांना या कामाबद्दल शुभेच्छा देतो. या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हातभार लावणा-या सर्वांचे नावही आता सरदार साहेबांच्या या पुतळ्याबरोबरच इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग बनला आहे.

मित्रांनो, आज हा प्रवास एका विशिष्ट थांब्यापाशी येवून पोहोचला. या प्रवासाचा प्रारंभ आठ वर्षे आधी याच दिवशी, दि.31 आॅक्टोबर, 2010 रोजी झाला होता. अहमदाबादमध्ये मी या दिवशी सरदार साहेबांच्या स्मारकाची कल्पना पहिल्यांदा सर्वांसमोर मांडली होती. कोट्यवधी भारतीयांप्रमाणेच माझ्याही मनात त्यावेळी एकच भावना होती की, ज्या महापुरुषाने देशाला एकत्रित करण्यासाठी इतका महान पुरुषार्थ दाखवला, त्याचा त्या व्यक्तीला योग्य सन्मान अवश्य मिळाला पाहिजे. असा गौरव मिळण्याचा त्या व्यक्तीला पूर्ण अधिकार, हक्क आहे. ज्या शेतकरी वर्गासाठी, कामगारांसाठी सरदार साहेब जीवनभर संघर्ष करत होते, त्यांच्याकडून असा सन्मान मिळावा, असंही मला वाटत होतं. हा त्या शेतकरी बांधवांकडून, कामगारांच्या श्रमातून सरदारजींचा केलेला गौरव आहे. मित्रांनो, सरदार पटेल यांनी खेडा ते बारडोलीपर्यंत शेतक-यांच्या शोषणाविरूद्ध आवाज उठवला होता. सत्याग्रह केला होता. त्याचबरोबर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर शोधले होते. आज त्याच सहकार आंदोलनामुळे देशातल्या अनेक गावांची अर्थव्यवस्था मजबूत आधार बनली आहे. हा सरदार साहेबांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे.

मित्रांनो, सरदार पटेल यांचे हे स्मारक म्हणजे त्यांच्याविषयी कोट्यवधी भारतीयांना वाटत असलेल्या सन्मानाचे आणि देशवासियांच्या सामर्थ्याचे  प्रतीक तर आहेच त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी रोजगार निर्माणाचे महत्वपूर्ण स्थान होणार आहे. यामुळे हजारो आदिवासी बंधू-भगिनींना दरवर्षी थेट रोजगार मिळणार आहे. सातपुडा आणि विंध्याचल पर्वतराजींमध्ये वास्तव्य करणा-या सर्व जनतेला निसर्गाने जे काही दान दिले आहे, तेच आता आधुनिक रूपामध्ये आपल्याला लाभदायक ठरणार आहे. देशाने ज्या जंगलांविषयी आत्तापर्यंत केवळ कवितांच्या माध्यमातून वाचले आहे, आता त्या जंगलांची त्या आदिवासी परंपरांची प्रत्यक्ष ओळख संपूर्ण दुनियेला होणार आहे. सरदार साहेबांचे दर्शन करण्यासाठी येणारे पर्यटक सरदार सरोवर धरण, सातपुडा आणि विंध्य पर्वतांचे दर्शनही करू शकणार आहेत. मी पुन्हा एकदा गुजरात सरकारचे कौतुक करतो. ते या पुतळ्या सभोवतालचा परिसर पर्यटन केंद्र स्वरूपामध्ये विकसित करीत आहेत. त्यांनी इथं फुलांचे खोरे तयार करून  हे स्मारक आकर्षण केंद्र बनवले आहे. आता मला असं वाटतं की, या भागात एक वेगळीच ‘एकता रोपवाटिका’ बनवण्यात यावी आणि इथं येणा-या प्रत्येक पर्यटकाला त्या एकता रोपवाटिकेतून एकतेचे रोप आपल्या घरी घेवून जाण्यासाठी दिले जावे. इथं येणारा प्रत्येक जण आपल्या घरी एकतेचे रोप लावेल आणि ते वाढताना पाहताना प्रत्येक क्षणी त्याच्या मनात देशाच्या एकतेचे स्मरण होईल. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायामुळे इथल्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून येणार आहे.

मित्रांनो, या जिल्ह्यात आणि या क्षेत्रामध्ये पारंपरिक ज्ञान खूप समृद्ध आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे पर्यटनाचा इथे विकास होणार आहेच, त्याचबरोबर इथल्या परंपरागत ज्ञानाचाही प्रसार होणार आहे. त्यामुळे या क्षेत्राची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. माझा या भागाशी खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे इथल्या अनेक गोष्टी मला चांगल्या माहिती आहेत. कदाचित माझ्या या बोलण्यामुळे इथं बसलेल्या अनेकजणांना इथल्या विशिष्ट वाणाच्या तांदळापासून बनवलेले ऊना-मांडा, तहला मांडा  , ठोकाला- मांडा यासारखे पदार्थ खाण्याची इच्छा होईल. इथे येणा-या पर्यटकांनाही हे खास इथले पदार्थ नक्कीच खूप आवडतील, खूप पसंत पडतील. याचप्रमाणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उगवणा-या रोपांविषयीचे सगळे गुणधर्म आयुर्वेदाच्या जाणकार  लोकांना चांगले माहिती असतील. या भागात मोठ्या प्रमाणात पिकणा-या खाती भेंडीचा औषधोपचारासाठी खूप वापर केला जातो. या खाती भेंडीमध्ये असंख्य औषधी गुण आहेत. त्याचा आता अगदी दूरपर्यंत प्रसार होणार आहे. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की, या स्मारकामुळे कृषी क्षेत्राला चांगले दिवस येण्यासाठी आणि त्याचबरोबर आदिवासींच्या जीवनातही सुधारणा घडवून आणण्यासाठी एक संशोधन केंद्रही इथे विकसित होईल.

मित्रांनो, गेल्या चार वर्षांमध्ये देशाच्या नायकांच्या योगदानाचे स्मरण करण्याचे एक खूप मोठे अभियान सरकारने सुरू केले आहे.  ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळीही माझा या गोष्टींबाबत आग्रह होता. ही आमची पुरातन संस्कृती आहे. संस्कार आहेत. त्यांना बरोबर घेवूनच आम्ही पुढची वाटचाल करीत आहोत. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा गगनचुंबी पुतळा असो, तसेच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्लीमध्ये एक आधुनिक संग्रहालयही आम्ही बनवले आहे. गांधी नगरचे महात्मा मंदिर आणि दांडी कुटीर असो, डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे पंचतीर्थ असो, हरियाणामध्ये शेतकरी नेते सर छोटूराम यांचा हरियाणातला सर्वात उंच पुतळा असो, कच्छच्या मांडवीमध्ये स्वातंत्र्य आंदोलनामधले सशस्त्र क्रांती घडवून आणणारे महान नेता, गुजरातचे सुपुत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांचे स्मारक असो, आणि आमच्या आदिवासी बंधू-भगिनींचे वीर नायक गोविंद गुरू यांचे श्रद्धास्थान असो, अशा अनेक महापुरूषांची स्मारके गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही तयार केली आहेत.

याशिवाय नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे दिल्लीमध्ये संग्रहालय असो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुंबईमध्ये भव्य पुतळा उभारण्याचे काम असो, या सर्व विषयांच्या माध्यमातून आम्ही इतिहास पुन्हा एकदा जीवंत करण्याचे काम करीत आहोत. बाबासाहेब यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी घटना दिवस व्यापक स्तरावर साजरा करण्याचा निर्णय असो अथवा नेताजींच्या नावे राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा असो, या गोष्टी आमच्या सरकारने सुरू केल्या आहेत. परंतु मित्रांनो, काही वेळेस तर मी अगदी वैतागून जातो. ज्यावेळी देशातले काही लोक आमच्या या मोहिमेकडे राजकीय चश्म्यातून पाहण्याचे दुःसाहस करतात त्यावेळी खरंच नवल वाटतं.

सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरूषांचा,महान सुपुत्रांचा गौरव केला म्हणूनही आमच्यावर टीका केली जाते. देशाच्या या सुपुत्रांचा गौरव करून जणू आम्ही खूप मोठा अपराध करीत आहोत, अशा प्रकारची टीका केली जात आहे. आता मी आपल्याला विचारू इच्छितो की, देशाच्या महापुरूषांचे स्मरण करणे हा काही गुन्हा, अपराध आहे का? मित्रांनो, आमचा प्रयत्न आहे की, भारतातल्या सर्व राज्यांच्या नागरिकांनी, प्रत्येक नागरिकाला जर आपला पुरूषार्थ दाखवायचा असेल तर सरदार पटेल यांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल करावी. हे करताना आपले संपूर्ण सामसामर्थ्‍य पणाला लावावे.

बंधू आणि भगिनींनो, सरदार पटेल यांनी स्वतंत्र भारतामध्ये ज्याप्रकारे गावाची कल्पना केली होती आणि त्याविषयीचा विचार स्वातंत्र्याआधीच तीन-चार महिने बोलून दाखवला होता. विठ्ठलभाई पटेल महाविद्यालयाच्या स्थापना कार्यक्रमामध्ये सरदार साहेबांनी हा विचार बोलून दाखवला होता. त्यांनी महाविद्यालयाच्या निर्माण कार्यक्रमात म्हटले होते की, आपण आपल्या गावांमध्ये कोणताही विचार न करता, अनियोजित पद्धतीने घरांची बांधणी करीत आहोत, रस्त्यांची निर्मिती करतानाही आपण कसलाही विचार करीत नाही. आणि घरांच्यासमोर तर कच-याचा ढीग साचलेला असतो. सरदार साहेबांनी त्यावेळी सर्व गावे उघड्यावर शौच करण्यापासून मुक्त करण्यात यावीत, सर्व गावे धूर आणि कचरा यांच्यापासून मुक्त असावीत,  यासाठी जनतेला आवाहन केले होते. सरदार साहेबांनी जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्याच्या मार्गाने प्रयत्न आमचे सरकार करत आहे, आणि देश पुढे जात आहे, याचा मला आनंद होतो आहे. जनभागीदारीमुळे आता देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छतेचा प्रसार 95 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

बंधू आणि भगिनींनो, सरदार पटेल यांना भारत सशक्त, संवेदनशील, सतर्क आणि समावेशी बनावा, असे वाटत होते. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. आम्ही देशातल्या प्रत्येक बेघरासाठी पक्के घरकुल देण्याच्या भगीरथ योजनेवर आम्ही काम करीत आहोत. ज्या गावांमध्ये स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होवूनही अद्याप वीज पोहोचली नाही, अशा 18 हजार गावांमध्ये आम्ही गेल्या चार वर्षांत वीज पोहोचवली आहे. आमचे सरकार सौभाग्य योजनेअंतर्गत,  देशातल्या प्रत्येक घरामध्ये वीजेची जोडणी देण्याचे काम करण्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम करीत आहे. देशाच्या प्रत्येक गावाला पक्क्या रस्त्याने जोडणे, ऑप्टिकल फायबर नेटवर्कने गावे जाडणे, डिजिटल संपर्क यंत्रणा कार्यान्वित करणे, हे काम आम्ही वेगाने पूर्ण करीत आहोत. देशातल्या प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस असावा, यासाठी सर्वांना गॅस जोडणी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक घरामध्ये शौचालयाची सुविधा निर्माण करून देण्यासाठी काम करण्यात येत आहे.

सरकारने दुनियेतली सर्वात मोठी योजना सुरू केली आहे. ज्यावेळी मी जगातल्या कोणत्याही नेत्यांना, लोकांना या योजनेची माहिती देतो, त्यावेळी जे आश्चर्यचकीत होतात. अमेरिकेची लोकसंख्या, मेक्सिकोची लोकसंख्या, कॅनाडाची लोकसंख्या यांची मिळून जितकी लोकसंख्या होते, त्यापेक्षाही जास्त लोकांसाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना आम्ही सुरू केल्या आहेत. काही काही वेळेस तर या योजनांना लोक ‘मोदी केअर’ योजना असंही लोक म्हणतात. या आरोग्यदायी भारताच्या निर्माणासाठी मदत करणा-या योजना आहेत. इतकेच नाही तर यामुळे भारत आयुष्मान होणार आहे. सर्वसमावेशी आणि सशक्त भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना आम्ही आमचा ध्येय मंत्र निश्चित केला आहे, तो म्हणजे, ‘ सबका साथ सबका विकास’ हाच आमचा ध्येय मंत्र आहे.

बंधू आणि भगिनींनो, सरदार साहेबांनी संस्थानांचे विलिनीकरण करून संपूर्ण देशाचे राजकीय एकीकरण घडवून आणले. आता आमच्या सरकारने ‘जीएसटी’च्या माध्यमातून देशाचे आर्थिक एकीकरण केले आहे. ‘वन नेशन वन टॅक्स’ चे स्वप्न आम्ही साकार केले आहे. भारत जोडणा-या सरदार साहेबांच्या कार्याचा सातत्याने विस्तार करीत आहोत. मग देशातल्या कृषी मंडया, बाजारपेठा असो, त्यांना जोडणारी ‘ई-नाम’ योजना आम्ही आणली. ‘वन नेशन वन ग्रीड’चे काम असो अथवा भारत माला, सेतू भारतम्, भारत नेक यासारखे अनेक कार्यक्रम आमच्या सरकारेने देशाला जोडण्यासाठी केले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे सरदार साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार निरंतर कार्यरत आहे.

मित्रांनो, आज देशाचा विचार करणारी युवकांची शक्ती आमच्याकडे आहे. देशाच्या विकासासाठी हाच एक मार्ग आहे. त्यावरून सर्व देशवासियांना बरोबर घेवून आपल्याला पुढे जायचं आहे. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्‍व  कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हिंदुस्तानची ही जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यामुळे देशाचे तुकडे करण्यासाठी केलेले प्रत्येक प्रयत्न हाणून पाडून तितक्याच कठोरतेने आपण उत्तर द्यायचे आहे. आणि म्हणूनच आपल्याला सर्व बाजूंनी, सर्व बाबतीत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.आपण सर्वांनी एक समाज म्‍हणून एकजूट बनून राहिले पाहिजे. आपण आज यासाठी एक प्रतिज्ञा करून आपल्या सरदार साहेबांच्‍या  संस्कारांचे पालन अतिशय पवित्रतेने संपूर्णपणे करूया. आपल्या भावी पिढ्यांमध्येही हे संस्‍कार  उतरवण्यासाठी कोणतीही कमतरता आपण ठेवायची  नाही, असा निश्‍चय आज करूया.

मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल प्रत्येक भारतीयाला उद्देशून म्हणत होते, आणि इथं लक्षात घ्या, मी आता सरदार साहेबांचे वाक्य आपल्याला ऐकवणार आहे. सरदार साहेब म्हणत होते,-‘‘ प्रत्येक भारतीयाने आपण कोणत्या जातीचे आहोत, कोणत्या वर्गातून आलो आहोत, हे पूर्णपणे विसरले पाहिजे. त्याने एकच गोष्ट कायम लक्षात ठेवावी, ती म्हणजे आपण भारतीय आहोत. आणि या देशावर आपला जसा आणि जितका अधिकार आहे, तितकीच, तशीच भारतीय म्हणून काही कर्तव्येही आहेत. सरदार साहेबांची ही शाश्वत भावना या बुलंद पुतळ्याप्रमाणे नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे. या कामनेबरोबर मी पुन्हा एकदा या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची निर्मिती म्हणजे, ही फक्त भारतवासियांसाठीच एक घटना नाही तर संपूर्ण दुनियेमध्ये इतका मोठा, उंच पुतळा नाही. त्यामुळे संपूर्ण दुनियेसाठीसुद्धा ही नवलाची गोष्ट आहे. त्यामुळेच आज संपूर्ण विश्वाचे लक्ष या माता नर्मदेच्या किना-याने आकर्षित करून घेतले आहे. या स्मारकाशी जोडले गेलेल्या प्रत्येक सहका-याला मी शुभेच्छा देतो. हे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी अभिनंदन करतो. माता नर्मदा आणि ताप्ती खो-यामध्ये वास्तव्य करणा-या प्रत्येक आदिवासी बंधू-भगिनींच्या, युवा सहकारींच्या चांगल्या, उज्ज्वल भविष्याची कामना मी करतो आणि त्यांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

संपूर्ण देश यावेळी जोडला गेला आहे. विश्वभरातले लोकही आज या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात, उत्साहात, आनंदामध्ये आणि प्रचंड ऊर्जा देणारा एकतेचा मंत्र आपण पुढे घेवून जाणार आहोत. या इथे हे एकतेचे तीर्थ तयार झाले आहे. एकतेची प्रेरणा, त्या प्रेरणेचा बिंदू आपल्याला इथून प्राप्त होत आहे. या भावनेबरोबरच आपण वाटचाल करीत आहोत आणि इतरांनाही पुढे घेवून जाणार आहोत. आपण यामध्ये सहभागी व्हावे, इतरांनाही सहभागी करून घ्यावे आणि  ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ बनवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी वाटचाल सुरू ठेवावी.

आपण माझ्याबरोबर नारा द्यावा-

सरदार पटेल- जय हो!

सरदार पटेल- जय हो! 

देश की एकता -जिंदाबाद !

देश की एकता -जिंदाबाद !

देश की एकता -जिंदाबाद !

देश की एकता -जिंदाबाद !

देश की एकता -जिंदाबाद !

खूप- खूप धन्यवाद!!

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor