Responsive image

Press Information Bureau

Government of India

Prime Minister's Office

सरदार पटेल यांच्या 142 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या "रन फॉर युनिटी" कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केलेले मनोगत

Posted On :31, October 2017 10:33 IST

भारत माता की जय

सरदार साहेब अमर रहे, अमर रहे

मोठ्या संख्येने उपस्थित युवा वर्ग, आज 31 ऑक्टोबर, सरदार वल्लभ भाई यांची जयंती. आज 31 ऑक्टोबर, भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथीही आहे.संपूर्ण देश सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्ताने, या महापुरुषाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन कसे समर्पित केले याचे आज स्मरण करत आहे. या महापुरुषाने, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, ठाकलेल्या संकट काळात, विखुरलेल्या वातावरणात, अंतर्गत संघर्ष पराकोटीला असताना आपल्या कौशल्याने, आपल्या दृढ शक्तीच्या बळावर, आपल्या सर्वोच्च भारत भक्तीने केवळ देशाला स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या संकंटांपासून वाचवले असे नव्हे तर इंग्रंजांचा, आपण गेल्यानंतर हा देश विखुरला जावा, छोट्या छोट्या संस्थानात विभागला जावा हा मनसुबा त्यांनी तडीला जाऊ दिला नाही. सरदार वल्लभ भाई पटेल यांनी दीर्घ दृष्टीने, साम, दाम, दंड, भेद, नीती, कूटनीती,रणनीती, या सर्वांचा उपयोग करत अतिशय कमी काळात, देशाला एकतेच्या सूत्रात गुंफले. सरदार वल्लभ भाई पटेल यांचा, देशाच्या नव्या पिढीला कदाचित परिचय करून दिला गेला नाही. एक प्रकारे इतिहासातून या महान नेत्याचे नाव पुसले जावे किंवा त्यांची थोरवी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र इतिहास साक्षी आहे की सरदार साहेबांना, कोणते सरकार स्वीकृती देवो अथवा न देवो, कोणताही राजकीय पक्ष त्यांची महानता स्वीकारो अथवा न स्वीकारो, मात्र या देशाची युवा पिढी एका क्षणासाठीही सरदार साहेबांना विसरायला तयार नाही. म्हणूनच देशाने आम्हाला जेव्हा सेवा करण्याची संधी दिली तेव्हा आम्ही सरदार पटेल यांची जयंती देशात विशेष स्वरूपात साजरी करून या महान नेत्याच्या कार्याचे भावी पिढयांना स्मरण राहावे यासाठी रन फॉर युनिटी अर्थात एकता दौडचे आयोजन केले आहे आणि मला आनंद आहे की देशाची युवा पिढी हिरीरीने या एकता दौडमध्ये सहभागी होत आहे.

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र बाबू यांनी म्हटले होते आणि त्यांचे शब्द आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. ते म्हणाले होते की, आज विचार करण्यासाठी आणि बोलण्यासाठी आपल्याला भारताचे नाव, भारत नावाचा देश उपलब्ध आहे.... सरदार वल्लभ भाई पटेल यांचा मुत्सद्दीपणा, प्रशासनावरची त्यांची मजबूत पकड यामुळेच हे शक्य झाले आहे. असे असूनही आपल्याला लवकरच सरदार साहेबांचा विसर पडला आहे असेही राजेंद्र बाबू पुढे म्हणाले.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, विविधतेतून एकता हा मंत्र आपण सदैव जपत आलो आहोत, मात्र या विविधतेचा आपण जोपर्यंत सन्मान करत नाही, आपल्या विविधतेचा आपण अभिमान बाळगत नाही, विविधतेतल्या एकतेच्या सामर्थ्याशी आपण तादात्म्य पावत नाही तोपर्यंत विविधता केवळ शब्दा पुरतीच उरेल. मात्र राष्ट्र निर्माणासाठी आपण त्या विविधतेचा तितकासा उपयोग करू शकणार नाही. प्रत्येक भारतवासीयासाठी ही अभिमानाची बाब आहे की जगातला प्रत्येक पंथ, प्रत्येक परंपरा, प्रत्येक आचार-विचाराला कोणत्या ना कोणत्या रूपात भारताने आपल्यात सामावून घेतले आहे. भाषा, बोली अनेक आहेत, खाणे-पिणे, पेहराव यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत तरीही देशासाठी एक राहणे, नेकीने राहणे हे आम्ही आम्हाला लाभलेल्या सांस्कृतिक वारश्यातून शिकलो आहोत.

आज जगात एकाच पंथाचे, एकाच परंपरेत वाढलेले लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. जगाला हिंसेच्या खाईत लोटून आपल्या मान्यतांचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न आज 21 व्या शतकात काही जण करत आहेत. अशा काळात हिंदुस्थान मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की आमचा असा देश आहे, आम्ही असे हिंदुस्तानवासी आहोत जे,जगातल्या परंपरा, पंथ आपल्यात सामावून घेत, एकतेच्या सूत्रात गुंफलो आहोत. हा आमचा वारसा आहे, ही आमची ताकद आहे. हा आमच्या उज्वल भविष्याचा मार्ग आहे. भाऊ बहिणीच्या प्रेमाला कोणी कमी लेखत नाही. भाऊ बहिणीने एकमेकांसाठी त्याग करणे ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे. तरीही या संस्कार सरितेला समृद्ध करण्यासाठी आम्ही रक्षा बंधन साजरे करतो. भाऊ आणि बहिणीच्या स्नेहाला दर वर्षी संस्कारित करण्याचा प्रयत्न करतो. देशाची एकता, देशाचा हा सांस्कृतिक वारसा मजबूत असूनही दर वेळेला त्याला पुनः संस्कारित करण्याची आवश्यकता असते. एकतेच्या मंत्राचे पुन्हा पुन्हा स्मरण करणे आवश्यक ठरते. एकतेने जगण्याचा संकल्प पुन्हा पुन्हा करणे आवश्यक असते.

देश विशाल आहे, पिढ्या बदलत राहतात. इतिहासातली प्रत्येक घटना माहित नसते. तेव्हा भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात, प्रत्येक क्षणी एकतेचा मंत्र निनादत राहणे, प्रत्येक क्षणी एकतेचा मार्ग शोधत राहणे, प्रत्येक क्षणी एकता दृढ करण्याच्या पद्धतीशी जोडलेले राहणे, भारतासारख्या देशासाठी अनिवार्य आहे. आपला देश अखंड राहावा. सरदार साहेबानी आपल्याला जो देश दिला आहे त्याची एकता आणि अखंडता कायम राखणे हे सव्वाशे कोटी देशवासियांचे उत्तरदायित्व आहे, सव्वाशे कोटी देशवासियांची जबाबदारी आहे. म्हणूनच सरदार पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी जे भगीरथ कार्य केले आहे त्याला जोडून त्यांचे पुण्य स्मरण केले पाहिजे. त्यांनी देशाला कसे एक केले हे प्रत्येक पिढीला माहित असले पाहिजे. हीच बाब घेऊन आम्ही आज 31 ऑक्टोबरला सरदार साहेबांची जयंती साजरी करत आहोत. आठ वर्षांनी सरदार साहेबांचे 150 वे जयंती वर्ष असेल. जेव्हा सरदार साहेबांच्या जयंतीला 150 वर्ष होतील तेव्हा आपण देशाला एकतेचे कोणते नवे उदाहरण देणार आहोत. जन मनातला हा एकतेचा भाव कसा दृढ करणार आहोत याचा संकल्प घेऊन आपल्याला वाटचाल करावी लागेल.

2022 मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत. भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार पटेल असे असंख्य लक्षावधी देशभक्त, देशासाठी जगले आणि देशासाठी त्यांनी प्राणाची बाजी लावली. 2022 मध्ये स्वातंत्र्याला 75 वर्षे होत आहेत तेव्हा आपणही मनात एक संकल्प घेऊया आणि तो संकल्प सिद्ध करण्यासाठी स्वतःला वाहून घेऊया. प्रत्येक हिंदुस्तानी व्यक्तीचा कोणता ना कोणता संकल्प असला पाहिजे. प्रत्येक हिंदुस्तानीने आपला संकल्प सिद्धीला नेण्यासाठी कठोर परिश्रम करायला हवेत. असा संकल्प जो समाजाच्या हिताचा आहे. असा संकल्प जो देशाच्या कल्याणासाठी आहे. असा संकल्प जो देशाचा गौरव वाढवणार आहे. अशा संकल्पासाठी आपण कटिबद्ध व्हावे. आज भारताच्या स्वातंत्र्याचे वीर सुपुत्र सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, 2022 साठी आपण संकल्प करावा आणि मला वाटते की ही काळाची गरज आहे.

आपण मोठ्या संख्येने आलात, उत्साहाने सहभागी झालात. देशभरातही युवा सहभागी झाले आहेत. आपणा सर्वाना राष्ट्रीय एकता दिनी शपथ घेण्यासाठी मी निमंत्रित करत आहे. आपण सर्व, सरदार वल्लभ भाई पटेल यांचे पुण्य स्मरण करत, मी जी शपथ आपल्यासमोर उच्चारेन,त्या शपथेचा आपण पुनरुच्चार करायचा आहे, केवळ वाणीने नव्हे तर मनापासून संकल्प धारण करण्याच्या भावनेतून प्रतिज्ञेचा उच्चार करावा. आपण सर्वानी उजवा हात पुढे करून माझ्या मागोमाग या प्रतिज्ञेचे उच्चारण करावे. मी निष्ठतापूर्वक शपथ घेतो की, देशाची एकता,अखंडता आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी मी स्वतःला वाहून घेईन आणि आपल्या देशबांधवांमध्ये हा संदेश पोहोचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन. देशाच्या एकतेच्या भावनेने मी ही शपथ घेत आहे. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या दूरदर्शीपणामुळे आणि कार्याद्वारे हे शक्य झाले आहे. आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षितता राखण्यासाठी आपले योगदान देण्याचाही मी निष्ठापूर्वक संकल्प करत आहे.

भारत माता की जय

भारत माता की जय

भारत माता की जय

अनेक अनेक धन्यवाद.

B.Gokhale/N.Chitale/Anagha